sports

प्रशासनाच्या आवाहनाला मदतीचा ओघ कायम ...

खटाव तहसिलकडे अनेक वस्तू सुपूर्द : प्रांताधिकारी कासार, तहसीलदार जमदाडे यांच्या प्रयत्नांना यश

सध्या तालुक्यातील अनेक ठिकाणी रुग्ण उपचार घेत आहेत. लोकवर्गणीच्या माध्यमातून रुग्णांना अंडी, बिस्कीट, फळे व इतर सकस आहार देण्यासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे. - किरण जमदाडे, तहसीलदार खटाव ( वडूज )

खटाव तालुक्यातील विविध ठिकाणी असणाऱ्या कोव्हीड सेंटरला लागणाऱ्या उपयोगी वस्तू देण्याबाबत खटाव प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत आहे. या आवाहनला तालुक्यातून तसेच इतर ठिकाणाहून मदतीचा ओघ कायम आहे. अनेक वस्तूरुपात येणाऱ्या मदती खटाव तहसिल कार्यालयात जमा झाल्या आहेत. ज्या ठिकाणी वस्तू पोहचण्याचे काम युद्धपातळीवर सुरू असल्याची माहिती खटाव तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितली आहे. याबाबत अधिक माहिती अशी की खांडके विंड मिल्स यांच्याकडून ५० बेड देण्यात आले आहेत. पुसेगाव येथील श्री सेवागिरी देवस्थानकडून २० बेड देण्यात आले आहेत. तसेच टाटा पॉवरचे प्रवीण पाटील यांच्याकडून सीसीसी सेंटर साठी ५ वॉटर फिल्टर देण्यात आले आहेत. हे वॉटर फिल्टर बसवण्यात आले आहेत. तसेच गोपुज साखर कारखान्याचे संग्रामसिंह देशमुख यांच्याकडून १ डुरा ऑक्सिजन सिलेंडर देण्यात आला आहे. आमदार शशिकांत शिंदे यांच्याकडून पुसेगाव सीसीसी सेंटरला मोठा जनरेटर देण्यात आला आहे. त्याचबरोबर औंध येथील गुरव समाज बांधवांकडून १० बेड देण्यात आले आहेत. प्रशासनाकडून वेळोवेळी मदतीचे आवाहन केले जात असून तालुक्यातील लोकांनी मोठ्या प्रमाणात मदतिचे हात पुढे केले आहेत. या आधी ही प्रशासनाने एका दिवसात ५० ऑक्सिजन सिलेंडर जमा करून फिलिंग साठी रवाना केले होते. तालुक्यातील रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याने प्रशासनाकडून अनेक उपाययोजना आखण्यात येत आहेत. गावोगावी भेटी, आयसोलेशन सेंटरला भेटी, देण्यात येत आहेत. याकामी सध्या खटाव प्रांत श्री कासार, तहसीलदार किरण जमदाडे, गटविकास अधिकारी रमेश काळे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.युनूस शेख, वैद्यकीय अधिकारी डॉ. संतोष मोरे हे ऍक्टिव्ह असल्याचे चित्र दिसत आहेत.