महागाईच्या विरोधात काँग्रेसचे साताऱ्यात आंदोलन
महागाई मुक्त भारत साठी कॉंग्रेस कमिटी समोर घोषणाबाजी
महागाई व जीवनावश्यक वस्तुवरील कर वाढविल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनासमोर निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.
सातारा : महागाई व जीवनावश्यक वस्तुवरील कर वाढविल्याने सर्वसामान्य जनतेचे कंबरडे मोडले आहे. परिणामी सर्वसामान्य जनतेला जगणे मुश्किल झाले आहे. त्याच्या विरोधात सातारा जिल्हा काँग्रेस कमिटीच्यावतीने काँग्रेस भवनासमोर निदर्शने करत गॅस दरवाढीचा निषेध नोंदवला.
केंद्र सरकारने चालवलेल्या लुटमारीच्या विरोधात अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीच्या आदेशानुसार काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार नाना पटोले यांच्या सूचनेनुसार आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली मोदी सरकारच्या महागाई विरोधात महागाई मुक्त भारत हे आंदोलन करण्यात आले.
जिल्हा काँग्रेस भवनासमोर जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने निदर्शने केली. यावेळी मोदी हटाव संसार बचाव, मोदी सरकारचा धिक्कार असो, मोदी सरकारचे करायचे काय, खाली मुंडी वर पाय, काँग्रेस पक्षाचा विजय असो, गॅस दरवाढ कमी झालीच पाहिजे.. अशा घोषणा देण्यात आल्या.
यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव म्हणाले, भाजप सरकारच्या काळात महागाईचा डोंगर वाढत चालला आहे. या महागाईमुळे सर्वसामान्य जनतेचे जगणे मुश्किल झाले आहे. गॅस दरवाढीने आता ग्रामीण भागातील महिला पुन्हा चुलीकडे वळू लागले आहेत. यावेळी महिला जिल्हाध्यक्ष अल्पनाताई यादव, जिल्हा सरचिटणीस नरेश देसाई, धनश्री महाडिक, जगन्नाथ कुंभार, मनोज तपासे, अन्वर पाशा खान, सुषमा राजे घोरपडे, रजिया शेख, अरबाज शेख आदी उपस्थित होते.