येथील बॅरिस्टर पी. जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारी बॅ. पी. जी. पाटील संशोधन शिष्यवृत्ती रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. गजानन खामकर यांना जाहीर झाली.
सातारा : येथील बॅरिस्टर पी. जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारी बॅ. पी. जी. पाटील संशोधन शिष्यवृत्ती रयत शिक्षण संस्थेच्या सावित्रीबाई फुले महिला महाविद्यालयातील अर्थशास्त्राचे प्रा. गजानन खामकर यांना जाहीर झाली.
बॅ. पी. जी. पाटील प्रतिष्ठानच्या वतीने दरवर्षी महाराष्ट्रातील संशोधन क्षेत्रात कार्यरत असणार्या अभ्यासकाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने संशोधन शिष्यवृत्ती दिली जाते.
प्रा. गजानन खामकर हे रयत शिक्षण संस्थेच्या विविध महाविद्यालय गेली आठ वर्षे अर्थशास्त्र विषयाचे अध्यापन करत असून, त्यांचे राष्ट्रीय स्तरावर बारा व आंतरराष्ट्रीय स्तरावर दोन शोधनिबंध प्रसिद्ध झाले आहेत.
मुंबई विद्यापीठ, मुंबई व शिवाजी विद्यापीठ, कोल्हापूर यांच्या दूर शिक्षण विभागासाठी प्रा. खामकर यांनी नऊ पुस्तकांमध्ये सहलेखन केले आहे.
सध्या ते ‘सातारा जिल्ह्यातील वित्तीय समावेशनाचा चिकित्सक अभ्यास’ या विषयावर शिवाजी विद्यापीठाचे माजी अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. विजय ककडे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएच.डी. करीत आहेत.
संशोधन शिष्यवृत्ती जाहीर झाल्याबद्दल रयत शिक्षण संस्थेचे ऑडिटर व महिला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. शिवलिंग मेनकुदळे यांच्या हस्ते प्रा. खामकर यांचा सत्कार करण्यात आला.
यावेळी वाणिज्य शाखेचे उपप्राचार्य डॉ. तुळशीराम महानवर, कला शाखेच्या उपप्राचार्य डॉ. सुनीता घार्गे, अर्थशास्त्र विभागप्रमुख डॉ. एस. एम. भोसले, महाविद्यालयाच्या शिष्यवृत्ती विभागाचे नोडल ऑफिसर प्रा. डॉ. जी. एस. भोसले, प्रा. दिलीप पवार, प्रा. लतिका पाटील यांनी प्रा. खामकर यांचे अभिनंदन केले.


