sports

शिवरायांच्या ‘राज्यशैली’चे अनुकरण केल्यास ‘भारत’ महासत्ता बनेल

खा. उदयनराजे भोसले यांचा आशावाद : सातार्‍यात ‘भाजप’च्या ‘शिवगान स्पर्धे’चे बक्षीस वितरण उत्साहात संपन्न

शिवगान स्पर्धेमुळे, शिवरायांच्या शौर्य, ध्यर्य, पराक्रम, बुद्धिचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन ते अंगीकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. त्यांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत देश महासत्ता बनेल,’ असा आशावाद खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

सातारा : ‘शिवगान स्पर्धेमुळे, शिवरायांच्या शौर्य, ध्यर्य, पराक्रम, बुद्धिचातुर्य, स्वयंशिस्त आदी गुणांचा प्रसार होऊन ते अंगीकारण्याची जाणीव जागृती झाली आहे. आगामी काळात शिवगान स्पर्धा अधिक व्यापक पद्धतीने आयोजित करण्यात आमचे नेहमीच सहकार्य राहील. तसेच युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज एकमेवाद्वितीय राजे होते. त्यांच्या राज्यशैलीचे अनुकरण केल्यास भारत देश महासत्ता बनेल,’ असा आशावाद खा. उदयनराजे भोसले यांनी व्यक्त केला.

भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठच्या वतीने आयोजित राज्यस्तरीय शिवगान स्पर्धेच्या बक्षीस समारंभ व समारोपप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील, सांस्कृतिक सेलचे राज्य संयोजक शैलेश गोजमगुंडे, माजी आमदार कांताताई नलावडे, भरत पाटील, लक्ष्मण सावजी, उपाध्यक्ष पंकज चव्हाण, यांच्यासह भाजपाचे आणि भाजपा सांस्कृतिक प्रकोष्ठचे सर्व पदाधिकारी, स्पर्धा परीक्षक नंदेश उमप, विसू बापट, विनिता जोशी आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘शिवसेनेचे मुख्यमंत्री असलेल्या या आघाडी सरकारने महाराष्ट्रात आजान स्पर्धा आयोजित केली. तथापि, भाजपाने हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांचे गुणगान गाणारी शिवगान स्पर्धा आयोजित केली. हिंदूत्वाच्या प्रश्‍नावर भाजपा आणि शिवसेनेमध्ये हा फरक आहे. ‘हिंदू’ या शब्दातच सर्वधर्म समभाव व्यापलेला आहे.’

गोजमगुंडे म्हणाले, ‘ही स्पर्धा भाजपाच्या राज्यस्तरीय नेत्यांच्या सहकार्याने आणि खा. उदयनराजे भोसले यांच्या सक्रिय सहकार्यामुळे होऊ शकली. महाराष्ट्रात 39 ठिकाणी ही स्पर्धा घेण्यात आली. स्पर्धेला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या स्पर्धेमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वावरील पोवाडे, गीते, पाळणे, लोकगीते यांचा समावेश होता. आठ जणांचा समूह गट आणि वैयक्तिक स्पर्धक अशा दोन गटांत ही स्पर्धा झाली आहे.’

यावेळी परीक्षक नंदेश उमप यांनी शिवरायांवर पोवाडा तर स्वातंत्र्यवीर सावरकर यांची नात विनिता जोशी यांनी आरती सादर केली. त्यास उपस्थितांनी भरभरून दाद दिली.

 

समूह गायन स्पर्धेत प्रथम क्रमांक सामगंध कला केंद्र, पनवेल, जि. रायगड (1 लाख रु., स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र). द्वितीय क्रमांक शिवकल्याण राजा, बीड (75 हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र). तृतीय क्रमांक मुळजी जेठा महाविद्यालय, जळगाव (51 हजार रु., स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र). उत्तेजनार्थ बक्षीस गंधर्व पृथ्वीराज माळी, सांगली व स्वरश्री, ठाणे यांना विभागून देण्यात आले.

वैयक्तिक गीत गायन स्पर्धेत नाशिकची नेहा मूर्ती प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक अनुक्रमे आदित्य लिमये रत्नागिरी व आकांक्षा चारभाई, नागपूर यांना मिळाला. तर उत्तेजनार्थ प्रथम व द्वितीय क्रमांक आश्‍लेशा कुलकर्णी जालना आणि सई ठकार हिला मिळाला.

वैयक्तिक पाच विजेत्यांना अनुक्रमे 41 हजार, 31 हजार, 21 हजार, 15 हजार, 7 हजार अशी रोख रक्कम, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले.

या स्पर्धेच्या यशस्वितेसाठी सांस्कृतिक प्रकोष्ठचे प्रदेश संयोजक शैलेश गोजनगुंडे यांच्यासह पंकज चव्हाण, उमेश घळसासी, गीतांजली ठाकरे, संचित यादव, राहुल वैद्य, सुनील सिन्हा, संजय भाकरे, विशाल जाधव, गुणाल गडेकर, नरेंद्र आमले, दीपक पवार, मयूर राजापूर, काजल राऊत, चैत्राली घळसासी, शिरीष चिटणीस, वैशाली राजेघाडगे, सौरभ सुपेकर, अतुल पाटोळे, अभिमन्यू तांबे, दीपाली देशमाने, हेमांगी जोशी, विकास बनकर, नंदा इंगवले, पायल टंगसाळे, आदित्य शेंडे, सातारच्या सांस्कृतिक सेलच्या टीमने परिश्रम घेतले.

कार्यक्रमाचे सांस्कृतिक प्रकोष्ठचे राज्य उपाध्यक्ष पंकज चव्हाण यांनी आभार मानले.