मी संघर्षातूनच वर आलो आहे, संघर्ष मला नवीन नाही
आ. शिवेंद्रसिंहराजे; भूलथापांना न भूलण्याचे मतदारांना केले आवाहन
देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही.
सातारा : देशातील एक आदर्श बँक असा नावलौकिक असलेल्या बँकेवर संचालकपदाच्या हव्यासापोटी तथ्यहीन आणि बिनबुडाचे आरोप केले जात आहेत. सवंग लोकप्रियतेसाठी बँकेवर आरोप करणाऱ्यांच्या फसवेगिरीला मतदार थारा देणार नाहीत. मी संघर्षातून वर आलो आहे. संघर्ष मला नवीन नाही. त्यामुळे कोणी काहीही करू द्या, कोणाला घाबरायचं काहीही कारण नाही. मी कायम तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असा शब्द जिल्हा बँकेचे चेअरमन आ. श्रीमंत छ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी मतदारांना दिला.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीनिमित्त शेंद्रे येथील स्व. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक भवन येथे आयोजित बँकेच्या सातारा तालुक्यातील मतदार मेळाव्यात आ. शिवेंद्रसिंहराजे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष चंद्रकांत जाधव, माजी शिक्षण सभापती सतीश चव्हाण, माजी सदस्य राजू भोसले, विद्यमान सदस्य प्रतीक कदम, जिल्हा बँकेचे संचालक प्रकाश बडेकर, कांचन साळुंखे, अनिल देसाई, माजी उपाध्यक्ष रविंद्र कदम, सातारा नगर पालिकेचे नगरसेवक अशोक मोने, अमोल मोहिते, अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, जयवंत भोसले, लीना गोरे, सोनाली नलावडे, दीपलक्ष्मी नाईक, कारखान्याचे चेअरमन सर्जेराव सावंत, उपाध्यक्ष विश्वास शेडगे, सर्व संचालक, रामभाऊ जगदाळे, लालासाहेब पवार, पंचायत समितीच्या सभापती सरिता इंदलकर, सदस्य जितेंद्र सावंत, राहुल शिंदे, दयानंद उघडे, गणपत शिंदे, उत्तमराव नावडकर यांच्यासह जिल्हा परिषद व पंचायत समितीचे आजी माजी सदस्य, विविध संस्थांचे पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती.
आ. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले, आपला स्वार्थ साध्य होत नसल्याचे दिसताच रेटून खोटं बोलायचं आणि चांगल्या संस्थेची बदनामी करायची, लोकांची आणि मतदारांची दिशाभूल करायची हा प्रकार सध्या जोमात सुरु आहे. त्याने काहीही साध्य होणार नाही उलट मतदार आणि जिल्हावासियांचे मनोरंजनच होत आहे. राज्य आणि देशपातळीवर नावाजलेल्या जिल्हा बँकेबाबत अपुऱ्या माहीच्या आधारे कोणी तथ्यहीन आरोप करत असेल तर त्या बँकेचा चेअरमन म्हणून त्या आरोपांचे खंडण करणे आणि वस्तुस्थिती जनतेसमोर मांडणे हे माझे कर्तव्यच आहे. बँकेचा इतिहास पाहता बँकेचे कामकाज राजकारणविरहित चालले आहे. ही निवडणूक सुद्धा पक्षविरहित होणार आहे. त्यामुळे जे बँकेच्या प्रगतीसाठी, शेतकऱ्यांच्या उन्नतीसाठी एकविचाराने काम करतात त्याच उमेदवारांना आणि त्यांच्या संपूर्ण पॅनेलला निवडून देणे ही आपली जबाबदारी आहे.
गेले पाच- सहा वर्ष चेअरमन म्हणून काम करताना बँकेची आर्थिक स्थिती आणखी भक्कम करण्याचा प्रयत्न मी केला आहे. बँकेच्या भागभांडवल, कर्जपुरवठा, ठेवी आदी सर्व बाबींमध्ये तीनपट वाढ झाली आहे. राज्यातीलच नव्हे तर देशातील इतर बँकांचे अधिकारी, पदाधिकारी आपल्या बँकेचे कामकाज पाहण्यासाठी येतात. नाबार्ड, रिझर्व बँक, ऑडिटर आदी कोणीही कोणताही आक्षेप बँकेच्या कामकाजावर कधीही घेतला नाही. असे असताना उगाच राजकीय स्वार्थासाठी एका आदर्श संस्थेची बदनामी करणे मुळीच योग्य नाही. त्यामुळे बँकेसाठी कोणी योगदान दिले आणि कोण योग्य आहे याचा विचार करून मतदारांनी मतदान केले पाहिजे.
स्व.भाऊसाहेब महाराजांनी तालुक्यात विविध सहकारी संस्थांची उभारणी केली आणि त्या नोंदणीकृत संस्था आता बँकेच्या मतदार आहेत. भाऊसाहेब महाराजांनंतर मी तुमच्या पाठबळावर संघर्षातूनच पुढे आलो आहे. त्यामुळे संघर्ष मला नवीन नाही, याची जाणीव संबंधितांनी ठेवावी. मतदारांनी कोणालाही घाबरायचे कारण नाही. काहीही असेल तर थेट माझ्याशी संपर्क साधा, मी कायम तुमच्या पाठीशी आहे. मी व माझ्या सहकारी नेत्यांकडून जे पॅनल निश्चित होईल त्यालाच सर्वांनी साथ द्यावी आणि आपल्याच उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी यावेळी केले.
राजू भोसले यांनी सूत्रसंचालन व स्वागत केले. सतीश चव्हाण, चंद्रकांत जाधव यांनी मनोगत केले. मेळाव्याला बँकेच्या सातारा तालुक्यातील विकाससेवा सोसायटी, खरेदी विक्री संघ, कृषी उत्पादन प्रक्रिया, नागरी बँका/ नागरी पतसंस्था, गृहनिर्माण व दूध उत्पादक संस्था, औद्योगिक विणकर व मजूर ग्राहक संस्था/ पाणीपुरवठा संस्था मतदारसंघातील सर्व मतदार उपस्थित होते.