दुर्दैवी घटना; आठ महिन्याच्या मुलासह विवाहितेची आत्महत्या
कराड तालुक्यातील कासारशिरंबे येथील घटना
By esahas.com web team Tue 22nd Jun 2021 03:35 pm
कराड : आठ महिने वयाच्या मुलास पोटाला बांधुन २३ वर्षीय महिलेने विहीरीत उडी घेवून आत्महत्या केली. ही घटना कासारशिरंबे ता. कराड येथील पालकराचा मळा नावाच्या शिवारात मंगळवारी सकाळी सातच्या सुमारास उघडकीस आली. राजश्री शंकर रासकर वय २३, मुलगा शिवतेज वय ८ दोघे रा. कडेगाव जि. सांगली अशी मृतांची नावे आहेत. दरम्यान, या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. याबाबत वनिता बबन दगडे वय ४० रा. काटकर मळा, कासारशिरंबे यांनी कराड ग्रामीण पोलिसांत खबर दिली आहे. या घटनेची माहिती मिळताच डीवायएसपी रणजीत पाटील, कराड ग्रामीणचे पोलीस निरीक्षक बाळासाहेब भरणे, उपनिरीक्षक राजू डांगे यांच्यासह पोलीस कर्मचारी घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी पंचनामा करुन दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. मृत राजश्री रासकर हिचे माहेर वाळवा तालुक्यातील नेर्ले असून सासर कडेगाव (जि. सांगली) आहे. तिचे मावशीच्या गावी कासारशिरंबे येथे प्राथमिक शिक्षण झाले होते. दोन वर्षापूर्वी तिचा विवाह झाला होता. तिचे मानसिक स्वास्थ बिघडले होते. ती दवाखान्यात जाते, असे सांगून सोमवारी सकाळी कडेगाव येथून निघून आली होती. मात्र दवाखान्यात न जाता ती सायंकाळी कासारशिरंबे येथे पोहोचली. तिने मावशीकडेही न जाता आठ महिन्याचा मुलगा शिवतेज याला स्वत:च्या पोटाला बांधून विहीरीत उडी घेतली, त्यामध्ये तिचा मृत्यू झाला, अशी प्राथमिक माहिती पोलिसांना मिळाली आहे. पोलीस उपनिरीक्षक राजू डांगे तपास करत आहे.