sports

बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव शासनाकडे सादर करा

ना. अजित पवार : आ. शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत अधिकार्‍यांना केल्या सूचना

जावली तालुक्यातील 54 गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत ना. पवार यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. दरम्यान, प्रस्ताव त

सातारा : जावली तालुक्यातील 54 गावांचा पाणी प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प मार्गी लागणे अत्यावश्यक आहे. हा प्रकल्प मार्गी लागावा यासाठी सातत्याने पाठपुरावा करणार्‍या आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार उपमुख्यमंत्री ना. अजित पवार यांनी सोमवारी जलसंपदा आणि पाणीपुरवठा विभागाची महत्त्वाची बैठक बोलावली. या बैठकीत ना. पवार यांनी बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा परिपूर्ण प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार करून शासनाकडे सादर करण्याच्या सूचना जलसंपदा विभागाच्या अधिकार्‍यांना केल्या. दरम्यान, प्रस्ताव तयार करण्यासाठी लागणारी 15 लाख रुपये रक्कम डीपीडीसीमधून जलसंपदा विभागाला देण्याची सूचनाही त्यांनी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली. 

या बैठकीला पाणीपुरवठा व स्वच्छता खात्याचे राज्यमंत्री ना. संजय बनसोडे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे यांच्यासह पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. संजय चहांदे, जलसंपदा विभागाचे सचिव एस. के. घाणेकर, सातारा विभागाचे अधीक्षक अभियंता प्रकाश मिसाळ यांच्यासह संबंधित सर्व अधिकारी उपस्थित होते. 

जावली तालुक्यातील 54 गावांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न सोडवण्यासाठी बोंडारवाडी धरण प्रकल्प तातडीने मार्गी लागणे आवश्यक असल्याचे आ. शिवेंद्रसिंहराजे यांनी सांगितले. बैठकीत  बोंडारवाडी धरण प्रकल्पाबाबत ना. पवार यांनी सविस्तर आढावा घेतला.  

दरम्यान, प्रस्ताव तयार करण्यासाठी 15 लाख रुपये खर्च अपेक्षित असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. यावर ना. पवार यांनी 15 लाख रुपये तातडीने डीपीडीसीमधून जलसंपदा विभागाला देण्याची सूचना जिल्हाधिकारी शेखर सिंह यांना केली. आ. शिवेंद्रसिंहराजे यांच्या पाठपुराव्यामुळे बोंडारवाडी धरण प्रकल्पाचा प्रस्ताव येत्या महिनाभरात तयार होऊन शासनाकडे सादर होण्याचा मार्ग यामुळे मोकळा झाला आहे.