maharashtra

संजय राऊत यांच्या साताऱ्यातील सभेकडे राहणार लक्ष

उदयनराजेंच्या वक्तव्याला काय प्रत्युत्तर देणार याची उत्सुकता

उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांनी आपले तोंड आरशात पहावे अशी टीका केली होती.

सातारा : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी विधिमंडळ नव्हे तर चोरमंडळ असे वक्तव्य करून महाराष्ट्राच्या राजकारणात खळबळ उडून दिली आहे. त्यांच्या या वक्तव्यावर खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांनी आपले तोंड आरशात पहावे अशी टीका केली होती. या टिकेला खासदार राऊत साताऱ्यात होणाऱ्या शिवगर्जना सभेत काय उत्तर देणार, याची खासी उत्सुकता ताणली गेली आहे.
ठाकरे गटाकडून शिवगर्जना संवाद यात्रेद्वारे उद्धव ठाकरे समर्थकांना पुरेपूर बळ देण्याचा प्रयत्न सध्या सुरू आहे. या तयारीचा एक भाग म्हणून कोल्हापूर, सांगली दौऱ्यानंतर शनिवारी खासदार संजय राऊत साताऱ्यात येत असून सायंकाळी पाच वाजता शाहू कला मंदिर येथे त्यांची सभा होणार आहे. या सभेत त्यांच्यावर झालेल्या टिकेचा ते कसा समाचार घेतात, याचीही उत्सुकता लागून राहिली आहे. संजय राऊत यांनी विधिमंडळाचा उल्लेख चोरमंडळ केल्याने शिंदे गट आक्रमक झाला आहे. राऊत यांनी केलेल्या टीकेवरून विधिमंडळात प्रचंड गदारोळ झाला असून त्यांच्या विरोधात हक्कभंग प्रस्ताव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शनिवारी जिल्हा दौऱ्यावर असणारे संजय राऊत कोणती राजकीय वक्तव्य करणार याकडे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागून राहिले आहे.
खासदार उदयनराजे भोसले यांनी सुद्धा कराड दौऱ्यावर या टीकेचा समाचार घेताना त्यांना आरशात पाहिल्यावर समजेल की विधिमंडळ की चोरमंडळ असा तिरकस टोला लगावला होता. खासदार उदयनराजे भोसले बुधवारी कराड दौऱ्यावर होते. त्यावेळी त्यांनी ही टीका केली होती.
सातारा जिल्ह्यात शिवगर्जना यात्रा येत असून ठाकरे गटाच्या सर्व समर्थकांना या सभेला पाचारण करण्यात आले आहे. सभेनंतर त्यांना विभागणी आहे. जबाबदाऱ्या आणि संवाद बैठकांचे आयोजन ठरवून देण्यात येणार आहे. शिवसैनिकांना खासदार संजय राऊत कशा पद्धतीने बळ देणार आणि कोणते मार्गदर्शन करणार, याची सर्वांनाच प्रतीक्षा आहे.