sports

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर आरटीओ कार्यालयातील कागदपत्रांच्या नूतनीकरणास 31 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ 

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांची माहिती 

गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात तसेच राज्यातही जवळजवळ सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 संबंधित विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या वैधतेच्या नूतनीकरणामध्ये देशातील व राज्यातील नागरिकांना तसेच वाहनमालकांना अडचणी येत आहेत. ज्या नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या आपापल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाच्या मुदती संपलेल्या आहेत, असे सर्व नागरिक व वाहनमालक देशातील तसेच राज्यातील विविध परिवहन

सातारा : गेल्या मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशात तसेच राज्यातही जवळजवळ सर्वच ठिकाणी लॉकडाऊन असल्यामुळे मोटार वाहन अधिनियम 1988 आणि केंद्रीय मोटार वाहन अधिनियम 1989 संबंधित विविध प्रकारच्या कागदपत्रांच्या वैधतेच्या नूतनीकरणामध्ये देशातील व राज्यातील नागरिकांना तसेच वाहनमालकांना अडचणी येत आहेत. ज्या नागरिकांच्या किंवा वाहनचालकांच्या आपापल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणाच्या मुदती संपलेल्या आहेत, असे सर्व नागरिक व वाहनमालक देशातील तसेच राज्यातील विविध परिवहन कार्यालयांमध्ये आपापल्या वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी गर्दी करीत असल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. शासकीय परिवहन कार्यालयामध्ये वाहनांच्या कागदपत्रांच्या नूतनीकरणासाठी नागरिकांची गर्दी होत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शासकीय परिवहन कार्यालयामध्ये कोरोना विषाणूचा संसर्ग आणि नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शासनाने नागरिकांच्या व वाहनचालकांच्या सर्व कागदपत्रांच्या नूतनीकरणाची मुदत दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत वाढविण्यात आल्याची माहिती सातार्‍याचे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी संजय राऊत यांनी दै.‘मुक्तागिरी’शी बोलताना दिली.
याबाबत अधिक माहिती देताना उपप्रादेशिक परिवहन अधिकारी राऊत म्हणाले, ‘कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर संपूर्ण देशाबरोबरच राज्यामध्ये विविध ठिकाणी लॉकडाऊनची मुदत सातत्याने वाढविण्यात आल्यामुळे देशातील व राज्यातील बहुतांशी नागरिकांना आपापल्या वाहनांच्या कागदपत्रांचे नूतनीकरण करण्यामध्ये विविध अडचणी येत होत्या. या अनुषंगाने रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने मोटार वाहन संबंधी कागदपत्रांची वैधता वाढविण्याबाबत सर्व राज्य व केंद्रशासित प्रदेशांना दि. 30 मार्च 2020 आणि दि. 9 जून 2020 रोजी एक अधिसूचना जारी केली होती. त्यानुसार वाहनांचे योग्यता प्रमाणपत्र, परवाना, वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी किंवा इतर कोणतेही संबंधित कागदपत्रे यांची मुदत वाढवता येऊ शकते किंवा लॉकडाऊनमुळे वाढवता येऊ शकली नाही आणि ज्याची मुदत दि. 1 फेब्रुवारी 2020 ते  दि. 30 सप्टेंबर 2020 रोजी दरम्यान संपेल अशी कागदपत्रे दि. 30 सप्टेंबर 2020 पर्यंत वैध मानली जाऊ शकतात, असा आदेश जारी करण्यात आलेला होता.
परंतु, देशभरात कोव्हिड-19 ही गंभीर परिस्थिती लक्षात घेता वरील सर्व कागदपत्रांचे नूतनीकरण करता येते किंवा लॉकडाऊनमुळे नूतनीकरण करता आले नाही आणि दि. 1 फेब्रुवारी 2020 रोजी ज्यांची मुदत संपली असेल किंवा दि. 31 डिसेंबर 2020 रोजी कालबाह्य होईल, अशी सर्व कागदपत्रे दि. 31 डिसेंबर 2020 पर्यंत वैध मानले जातील. यामुळे सर्व नागरिकांना वाहतुकीशी संबंधित सेवेचा लाभ घेता येणार आहे, मात्र यामध्ये विमा प्रमाणपत्रांचा समावेश करण्यात आलेला नाही.’
राऊत पुढे म्हणाले, ‘कोरोनाच्या गंभीर परिस्थितीत नागरिक, वाहतूकदार आणि अनेक संस्था यांना त्रास होऊ नये तसेच कायदेशीर अडचणींना सामोरे जाऊ लागू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. सदर बाबींची नागरिक तसेच वाहतूकदार चालक-मालक यांनी नोंद घ्यावी, अशी विनंती शासकीय परिवहन कार्यालयामार्फत आणि शासनाच्यावतीने करण्यात आलेली आहे. नागरिकांना कोव्हिड-19 चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता कार्यालयात गर्दी करण्याचे टाळावे आणि सोशल डिस्टन्िंसगचे पालन करावे, याची सर्व नागरिकांनी नोंद घेण्याचे आवाहन परिवहन कार्यालयामार्फत करण्यात आले आहे.