लोणंद पोलिसांची कामगिरी : सासवड येथे दोन हजार लिटर पेट्रोल मुरल्याने शेतीचे झाले होते मोठे नुकसान
लोणंद : सासवड, ता. फलटण येथे काही दिवसांपुर्वी पेट्रोल पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोल चोरी झाली होती. मात्र, यामुळे दोन हजार लिटर पेट्रोल आजूबाजूच्या जमीनीत मुरले जावून शेतीचे नुकसान झाले होते. याप्रकरणी लोणंद पोलिसांनी पर्दाफाश करत सातजणांच्या मुसक्या आवळल्या.
अनित हरीशंकर पाठक वय 32 रा. मूळ गाव पिंडराई पटखान, जि. वाराणसी, सध्या रा. वाल्हेकरवाडी चिंचवड, बाळू आण्णा चौगुले वय 42 रा. रामनगर चिंचवड पुणे, मोतीराम शंकर पवार वय 20 रा. गवळीमाथा भोसरी पुणे, इस्माईल पिरमहंमद शेख वय 62 रा. डी-मार्ट शेजारी पिंपरी पुणे, शाम शिवाजी कानडी वय 50 रा. वाल्हेकरवाडी चिंचवड, दत्तात्रय सोपान लोखंडे वय 41 रा. सासवड, ता. फलटण, नामदेव ज्ञानदेव जाधव वय 28 रा. दालवडी, ता. फलटण अशी त्यांची नावे आहेत.
याबाबत माहिती अशी, 23 मार्च रोजी दुपारी साडेतीनच्या सुमारास सासवड, ता. फलटण गावचे हद्दीतून जमीनीच्या खालून जाणारी एचपी कंपनीच्या पेट्रोल पाईप लाईनला छिद्र पाडून पेट्रोलची चोरी करण्याचा प्रयत्न झाला. परंतु, त्यातून मोठी गळती लागून तब्बल दोन हजार लिटर पेट्रोल शेजारच्या ज्वारीच्या शेतात पसरले. जमीनीत मुरलेले पेट्रोल आजुबाजुचे विहीरीत उतरल्यामुळे शेतीचे मोठे नुकसान झाले होते.
दरम्यान, हिंदुस्थान पेट्रोलियम कार्पोरेशन लि.चे सहाय्यक प्रबंधक विकी सत्यवान पिसे यांनी 1 लाख 90 हजारांच्या पेट्रोलचे नुकसान झाल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात दिली होती. त्यावरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग तानाजी बरडे यांनी गुन्हा उघडकीस आणण्याबाबत लोणंद पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी विशाल के. वायकर यांना सुचना दिल्या होत्या.
त्यानुसार सपोनि वायकर यांनी तांत्रिक माहितीच्या आधारे गुन्हे प्रकटीकरण पथकासोबत यातील सराईत अंतरराज्य टोळीतील सात आरोपी निष्पन्न करुन त्यांना गुन्हे शाखा क्रमांक दोन पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालय यांच्या मदतीने पिंपरी चिंचवड परिसरातून शिताफीने सापळा रचून ताब्यात घेतले. यानंतर तपासात इंट्रॉगेशन स्किलचा वापर करुन टोळीचा पर्दाफाश करत सातजणांना अटक केली. या आरोपींनी गुन्हा केल्याचे कबुल केल्याने तसेच त्यांनी अशा प्रकारे पेट्रोल चोरीचे गुन्हे महाराष्ट्रातील अनेक जिल्हयांमध्ये केल्याचे तपासात निष्पन्न झाले असून त्यांना या गुन्हयात अटक करण्यात आली आहे. आरोपींना प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी फलटण यांचे न्यायालयात हजर करुन त्यांची दि 12 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी घेण्यात आली आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश माने करत आहेत.
पोलीस अधिक्षक अजयकुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धिरज पाटील यांच्या सुचनेप्रमाणे व उपविभागीय पोलीस अधिकारी फलटण विभाग तानाजी बरडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विशाल के. वायकर, पोलीस उपनिरीक्षक गणेश माने, गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पो.ना.संतोष नाळे, श्रीनाथ कदम, सपोफौ. अंकुश इवरे, अनिल भोसले, शौकत सिकिलकर, पोहवा महेंद्र सपकाळ, संजय जाधव, पोकॉ. अविनाश शिंदे, सागर धेंडे, अभिजित घनवट, विठ्ठल काळे, नाना होले, ज्ञानदेव साबळे, शशिकांत गार्डे, शिवाजी सावंत, चालक विजय शिंदे यांनी कारवाईत सहभाग घेतला आहे.
विशाल वायकर व टीमचे पोलिस अधीक्षकांकडून अभिनंदन
गुन्ह्याचा यशस्वीरित्या तपास केल्याबद्दल पोलिस अधीक्षक अजय कुमार बंसल यांनी लोणंद पोलिस ठाण्याचे सपोनि विशाल वायकर आणि त्यांचा टिमचे अभिनंदन केले. तसेच आरोपींना एमपिडीए एक्ट लावण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले.