लॉकडाऊन काळातही वेड्या ‘बहिणी’ची रे वेडी ही माया..!
यंदाचा रक्षाबंधन दोघांच्या सहवासात; जुन्या आठवणींना दिला उजाळा
कोरोना विषाणूनं अवघ्या जगात हाहाकार उडाल्यानं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. पण नोकरी अन् शिक्षणानिमित्त परशहरात ‘झेप’ घेतलेली ‘बहीण-भावंडं’ पुन्हा कुटुंबाच्या छायेखाली आली. बहीण-भावामध्ये कितीही भांडण अथवा चीड असली तरी दोघांमधील अतूट नात्यातील ‘प्रेम’ त्यांना एकत्र आणतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या निमित्तानं ‘बहीण-भावा’चं प्रेम अधिक वृद्धिंगत झाल्याचं पाहावयास मिळालं.
विकी जाधव
सातारा : कोरोना विषाणूनं अवघ्या जगात हाहाकार उडाल्यानं संसर्ग टाळण्यासाठी शासनानं सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर केला. त्यामुळं सर्वांना ‘घरबंद’ व्हावं लागलं. पण नोकरी अन् शिक्षणानिमित्त परशहरात ‘झेप’ घेतलेली ‘बहीण-भावंडं’ पुन्हा कुटुंबाच्या छायेखाली आली. बहीण-भावामध्ये कितीही भांडण अथवा चीड असली तरी दोघांमधील अतूट नात्यातील ‘प्रेम’ त्यांना एकत्र आणतं, हे पुन्हा एकदा अधोरेखित होत आहे. त्यामुळं लॉकडाऊनच्या निमित्तानं ‘बहीण-भावा’चं प्रेम अधिक वृद्धिंगत झाल्याचं पाहावयास मिळालं.
यंदा श्रावण महिन्यात आलेल्या ‘नारळी पौर्णिमे’दिवशी म्हणजे आज सोमवार (दि. 3 ऑगस्ट) रोजी ‘रक्षाबंधन’ हा सण सर्वत्र साजरा केला जाणार आहे. बहीण-भावाच्या अतूट, उत्कट प्रेमाची आठवण करून देणारा हा सण विशेष महत्त्वाचा असून, उत्तर भारतात हा सण ‘राखी’ या नावाने प्रसिद्ध आहे, तर दक्षिण भारतात हा सण कार्तिक महिन्यात ‘कार्तिकेय’ नावाने साजरा केला जातो.
मुख्यतः नोकरी अन् शिक्षणामुळं घराबाहेर पडणार्या बहीण-भावंडांना हा दिवस मनासारखा साजरा करता येत नव्हता. यंदा मात्र प्रत्येक घरात सर्व भावंडं एकत्र येऊन ‘रक्षाबंधन’ हा सण साजरा करणार आहेत. त्यामुळे कोरोना संकट काळातही ‘रक्षाबंधन’ हा सण अनेक बहीण-भावंडांच्या विशेष स्मरणात राहील, असं म्हटलं वावगं ठरणार नाही.
तसेच लॉकडाऊन काळात आपली मुलंबाळं एकत्र आल्यानं आई-वडिलांच्याही चेहर्यावर आनंद पाहावयास मिळालाय. या अगोदर बहीण-भावंडं शिक्षणामुळं परशहरात असल्यानं या कुटुंबात भयाण शांतता होती; पण लॉकडाऊनमुळं याच कुटुंबात आता दंगा-मस्तीचा आवाज घुमू लागलाय. तसेच ही भावंडं जुन्या आठवणीतही रमताना दिसताहेत. त्यामुळं बहीण-भावाच्या प्रेमाची महती सांगणारा ‘रक्षाबंधन’ हा सण या दोघांमधील प्रेम अधिक वृद्धिंगत करेल, हे मात्र नक्की..!
...अन् दुरावलेली भावंडं आली एकत्र
लहानपणी एकत्र खेळणारे, बागडणारे भाऊराया नोकरी-व्यवसायामुळे घरापासून दूरच्या शहरात स्थिरावले तर लग्न झाल्यानंतर बहिणीही सासरी गेल्या. परंतु, यंदा लॉकडाऊनमुळं एकमेकांपासून दुरावलेली बहीण-भावंडं एकत्र आली. त्यामुळं या भावंडांना आपल्या जुन्या आठवणींना उजाळा देता आला. तसेच काहींनी तर लॉकडाऊनच्या काळात आपले जन्मदिवस वृक्षारोपण करून साजरे केले. त्यामुळे प्रत्येकाच्या मनात आजही त्या जुन्या आठवणींनी घर केल्याचे दिसून येतेय..
दादा नोकरीसाठी मुंबईला तर मी वैद्यकीय शिक्षणासाठी नाशिकला. बरेच वर्षे आमची गाठभेट झाली नव्हती. पण यंदा कोरोनानं सर्वत्र थैमान घातल्यामुळं लॉकडाऊन करण्यात आल्यानं आम्ही दोघंही सातार्याला आलो. त्यामुळं आमच्या लहानपणीच्या जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. तसेच दादाशीही काही गोष्टी मनमोकळेपणाने शेअर करता आल्यानं ‘रक्षाबंधन’ हा सण आम्हा दोघांमधील प्रेमाला नवं रूप देणारा ठरणार असून, त्यामुळे सर्व बहीण-भावंडांना ‘रक्षाबंधना’च्या खूप-खूप रूपेरी शुभेच्छा..!
- उर्वशी जाधव, सातारा.
माझी ताई नोकरीनिमित्त औरंगाबादला तर मी शिक्षणासाठी पुण्याला. पण यंदा कोरोनामुळं सर्वत्र लॉकडाऊन करण्यात आल्यानं आम्ही दोघंही गावी आलो. या अगोदर ताई अन् माझं बोलणं फक्त फोनवरच व्हायचं; पण यंदा ताईला बर्याच वर्षांनंतर भेटण्याची संधी लॉकडाऊनमुळं मिळाली. दरम्यानच्या काळात ताईशी जुन्या आठवणींबद्दलही बर्याच गप्पा मारता आल्या. त्यामुळं यंदाचा ‘रक्षाबंधन’ आम्हा दोघांच्याही कायम स्मरणात राहील.
- ऋत्विक पाटील, सातारा.


