sports

फलटण शहरासह तालुक्याला मुसळधार पावसाने झोडपले


फलटण शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अनेक भागात जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गारांच्या पावसाचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे आनंद लुटला तर फलटण शहरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते तसेच रस्ते जलमय झाले होत.े

फलटण : फलटण शहरासह तालुक्यात सोमवारी पावसाने विजांच्या कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. अनेक भागात जोरदार गारपीट झाल्याने हवेत गारवा निर्माण झाला होता. गारांच्या पावसाचा आनंद अनेकांनी मनमुरादपणे आनंद लुटला तर फलटण शहरात अनेक घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले होते तसेच रस्ते जलमय झाले होत.े

सोमवारी दुपारी 4च्या दरम्यान मुसळधार पावसामुळे ठिकठिकाणी पाण्याची तळी साचल्याचे चित्र दिसून येत होते. फलटण परिसरात सोमवारी दुपारच्या सुमारास  पावसाला सुरुवात झाली. फरांदवाडी कोळकी, जाधववाडी, ठाकुरकी, धुळदेव, चौधरवाडी या भागात पावसाचा वेग अधिक राहिला. जोरदार पावसासह गारांचा वर्षावही झाला. तालुक्यातील काही भागांत मध्यम स्वरूपाच्या सरी कोसळल्या. काही वेळेतच रस्त्यांवरून पाण्याचे पाट वाहू लागले होते. 

वादळी वारा सुटताच शहरासह उपनगरांमधील विद्युत पुरवठा खंडित झाला. साडेपाचच्या सुमारासच मोठा काळोख पसरला होता. बर्‍याच कालावधीनंतर गारांचा पाऊस आल्याने गारा गोळा करण्यासाठी नागरिकांची धांदल उडाली. गारांचे फोटो सर्वांच्या मोबाईलवरून आणि स्टेटसवरून फिरत होते. 

दोन तासांहून अधिकवेळ पाऊस सुरू होता. गारपिटीमुळे कांदा, आंबा, मका या पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे.शहरातील अनेक रस्ते जलमय होऊन वाहत होते. अनेकांच्या घरात पावसाचे पाणी शिरल्याने नुकसान झाले आहे.

मागील काही दिवसांपासून शहरात उन्हाची तीव्रता अधिकच जाणवत होती. पारा चाळिशीला टेकल्याने वातावरणात उष्मा कमालीचा वाढला होता. अचानक आलेल्या  दमदार पावसाच्या हजेरीमुळे वातावरण काही प्रमाणात थंड झाल्याने उकाड्यापासून नागरिकांना दिलासा मिळाला. मागील चार ते पाच दिवसांपासून कमाल व किमान तापमानात वाढ होत होती.