maharashtra

पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज


The police need to curb political pressure and curb criminal tendencies
गेल्या काही वर्षात फलटणमधील संघटीत गुन्हेगारीला चांगला चाप बसला होता. अपवादात्मक घटना वगळता फलटण शांत होते. मात्र, बुधवारी पुन्हा संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून यामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर फलटणमध्ये डोक्याला ताप होणारच, खून होणारच अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य असल्याचे दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज असल्याची आजच्या घडीला तमाम फलटणकरांमध्ये भावना आहे.

सातारा : गेल्या काही वर्षात फलटणमधील संघटीत गुन्हेगारीला चांगला चाप बसला होता. अपवादात्मक घटना वगळता फलटण शांत होते. मात्र, बुधवारी पुन्हा संघटीत गुन्हेगारीने डोके वर काढले असून यामध्ये ठोस कारवाई झाली नाही तर फलटणमध्ये डोक्याला ताप होणारच, खून होणारच अशी स्थिती निर्माण होवू पाहत आहे. त्यामुळे पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य असल्याचे दाखवत गुन्हेगारी प्रवृत्तींना मोक्का लावण्याची गरज असल्याची आजच्या घडीला तमाम फलटणकरांमध्ये भावना आहे.
फलटणमध्ये सध्या नगरपालिका निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. निवडणूक ही लोकशाहीतील एक प्रक्रिया असून सनदशीर मार्गाने सर्वांना त्या प्रक्रियेत सहभागी होण्याचा हक्क आहे. मात्र, निवडणूक लागली की फलटणमध्ये दहशत निर्माण करण्याची काहींची विशेषत: सत्ताधार्‍यांची परंपरा आहे. त्यामुळे शहरातील वातावरण दूषित होते, भयभीत होते. त्या अनुषंगाने सत्तेसाठी हपापलेली राजकीय मंडळी हा खेळ सुरु करतात.
बुधवार दि. 12 रोजी फलटण शहर एका युवकाच्या खुनाच्या घटनेने हादरले. अगोदरच कोरोना उरावर बसलेला असल्याने आर्थिक, सामाजिक फटके खात असलेली सर्वसामान्य जनता लॉकडाऊन झालाच तर उपासमारी होईल, या भीतीमध्ये जगत आहे. त्याच फलटण शहरात पवारगल्लीत राहणार्‍या निलेश हिरालाल चव्हाण व त्याचा मित्र भरत फडतरे यांना राम मंदिराजवळ टोपी चौकात पानटपरीजवळ सलीम शेख, सैफुला सलीम शेख, जमीर सलीम शेख, बिलाल व राज बागवान व एक अनोळखी अशा सहाजणांनी भर दिवसा आमच्या गावातील मुलीची छेड काढतो काय म्हणत लोखंडी तलवार, लोखंडी पाईप, लाकडी दांडक्याने अमानूषपणे मारहाण केली.
ही घटना सुरु असताना या परिसरात प्रचंड दहशतीचे, भीतीचे वातावरण पसरले होते. कोणीही सुजाण नागरिक हा प्रकार थांबवण्यास भीतीपोटी पुढे आले नाहीत. निलेश चव्हाण याच्या घरच्यांना टोपी चौकात निलेश व त्याच्या मित्राला मारहाण सुरु असल्याचे सांगितल्यावर निलेश याची आई धावत, पळत घटनास्थळी गेली. तिथे हे सहा गुंड मारहाण करुन पळून गेले होते. गंभीर जखमी अवस्थेत निलेश निपचित पडला होता. त्याला ऍडमिट केल्यावर काय झाले असे विचारले असता निलेशने सलीम शेख याच्या मुलांनी व इतरांनी मारहाण केल्याचे सांगितले.
प्रचंड आक्रोश करत निलेश याचे कुटुंबिय त्याला वाचवण्यासाठी उपजिल्हा रुग्णालयातून फलटणमधील लाईफ लाईन हॉस्पिटलमध्ये घेवून गेले. मात्र, गंभीर मारहाण झालेल्या निलेश याला तिथे डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर निलेश याचा मित्र भरत फडतरे हा देखील या मारहाणीत गंभीर जखमी झालेला असून त्याला उपचारासाठी बारामतीच्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले आहे. या घटनेमुळे फलटणमधील वातावरणात दहशत निर्माण झालेली असून फलटणकर या खुनाच्या घटनेने हादरुन गेलेले आहेत.

कोण आहे हा सलीम शेख वस्ताद?
फलटणमध्ये गुंडगिरी निर्माण करण्यात राजकीय मंडळींचा हातभार असतोच. मात्र, पोलीस अधिक्षक के. एम. प्रसन्ना, डॉ. अभिनव देशमुख, संदीप पाटील यांच्यासारख्या निडर अधिकार्‍यांनी सातारा जिल्ह्यासह फलटण तालुक्यातील दहशत मोडीत काढली. त्यामुळे भले-भले गुंड शांत होते. आताच्या घटनेतील सलीम शेख हा सलीम वस्ताद नावाने प्रसिध्द असून दहा वर्षांपूर्वी एका ‘पॉवरफूल’ पुढार्‍याचे लक्ष वेधून घेण्यासाठी त्याने एकाच्या हातावर सत्तूरने वार करत त्याची बोटे तोडली होती. त्यावेळीपासून त्याचा राजकीय प्रवास सुरु झाला आहे. तो नगरसेवकही होता. आता तो कोणासाठी काम करायचा, हे सर्व फलटणकरांना ज्ञात आहे.
 
बापानंतर आता मुलांकडून दहशत
सलीम वस्ताद हा कुस्ती शिकवायचा म्हणून वस्ताद. मात्र राजकारणात आल्यानंतर तो सराईत गुंडच झाला. त्याच्या पाठोपाठ त्याची मुलेही आता फलटणमध्ये रंग दाखवू लागलेली असून कालच्या घटनेत वस्तादासह त्याच्या मुलांवर खुनाचा गुन्हा दाखल झालेला आहे. बिलाल, राज बागवान हे जोडीला आहेतच. हा संघटीत गुन्हेगारीचा प्रकार असल्याचे नागरिकांकडून सांगितले जात आहे. नागरिकांना भीतीच्या छायेखाली जगण्यास भाग पाडणारी ही गुन्हेगारी पोलिसांना रोखावीच लागणार आहे.
 
कायद्याचे राज्य असल्याचे कळू द्या!
या देशात संविधानाने सर्वांनाच समानतेने जगण्याचा अधिकार दिला आहे. मात्र, काही प्रवृत्तींचा गैरवापर करत गुन्हेगारी बोकाळण्यास राजकीय मंडळींचा सहभाग असतो. अशा घटनांना वेळीच पायबंद घालण्यासाठी आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रात खर्‍या अर्थाने सत्याला न्याय दिला जातो हे बोलण्यापेक्षा कृतीत आणून पोलिसांनी व गुन्हेगारी प्रवृत्तींना पाठबळ देणार्‍यांनी जागे होण्याची गरज आहे. त्यानुषंगाने खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली आहे. अन्यथा फलटणकरांच्या डोक्याचा ताप असाच वाढत जाईल.

जात बघू नका, न्याय द्या!
भारतीय संविधानाने सर्वांना समान वागणूक द्या, न्याय द्या, सर्वांना निर्भयपणे जगू द्या. जातीपातीच्या पलिकडे जावून माणसाने माणसांशी माणसांसारखे वागावे ही तत्वे दिलेली आहेत. मात्र, फलटणमध्ये एखादा मेला तर त्याची जात कोणती, हे पाहिले जाते आणि नंतर न्याय द्यायचा की नाही याची प्रक्रिया सुरु होते ही मोठी दुर्देवी बाब आहे. जात पाहून न्याय देण्यासाठी राजकीय मंडळींचा पुढाकार असतो. यंत्रणेवर दबाव असतो हे अशा राजकीय मंडळींसह लोकशाहीला घातक आहे. सत्याला पाठिंबा दिला पाहिजे असे जाहीर व्यासपीठावर बोलणार्‍यांनी व पोलीस यंत्रणेने देखील सत्याजवळ जावून त्यांची कृती ही लोकहित व देशहिताची असल्याचे दाखवून देण्याची वेळ आली आहे.

सल्या असो वा चेल्या, मोक्का लावा, गुन्हेगारी मोडा
खून, मारामार्‍या यांमुळे सामाजिक जीवनातील कायदा व सुव्यवस्था मोडकळीस येते. आता फलटणमध्ये नगरपालिकेची निवडणूक लागली आहे. त्यामुळे अशा प्रवृत्ती बळावण्याची चिन्हे असून हे पोलिसांपुढे आव्हान असणार आहे. पोलीस अधिक्षक अजयकुमार बन्सल यांनी आता यात लक्ष घालून फलटण शहरातील गुंडगिरी मोडून काढण्यासाठी उभे ठाकले पाहिजे. घडलेला प्रकार हा संघटीत गुन्हेगारीचा असून गुन्हेगार सोशल मिडियावर हत्यारासह फोटो टाकून फलटणकरांना दहशत दाखवत आहे. आता कोणी सल्या असो वा चेल्या असो, फलटणकरांना दहशतीमधून बाहेर काढण्यासाठी पोलिसांनी राजकीय दबाव झुगारुन खर्‍या अर्थाने कायद्याचे राज्य आहे हे दाखवण्यासाठी मोक्काचे हत्यार उपसण्याची वेळ आली असून तमाम फलटणकरांचेही पोलिसांना तेच साकडे आहे.