sports

शिक्षकांनी ऑनलाइन पद्धतीच्या आधुनिक शिक्षण पद्धतीला सामोरे जाणे काळाची गरज

एन. के. जरग यांचे आझाद कॉलेजच्या शिक्षक दिन कार्यक्रमात प्रतिपादन

‘आपल्या समाज व्यवस्थेतील प्रत्येक शिक्षक शिक्षणाबरोबरच आपले सामाजिक उत्तरदायित्व कर्तव्य भावनेने पार पडत असतात. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार, आचार-विचार व संस्कृती या सर्व बाबींचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सर्व शिक्षक आपापल्यापरीने योग्य प्रकारे पार पाडत असतात.

सातारा : ‘आपल्या समाज व्यवस्थेतील प्रत्येक शिक्षक शिक्षणाबरोबरच आपले सामाजिक उत्तरदायित्व कर्तव्य भावनेने पार पडत असतात. विद्यार्थ्यांच्या मनावर सुसंस्कार, आचार-विचार व संस्कृती या सर्व बाबींचे योग्य मार्गदर्शन करण्याची जबाबदारी सर्व शिक्षक आपापल्यापरीने योग्य प्रकारे पार पाडत असतात. शिक्षक हा सामाजिक परिवर्तनाचा हातभार लावणारा समाजातील महत्त्वाचा घटक आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर आणि भविष्यात येणार्‍या अनेक गंभीर संकटावर मात करून आजच्या शिक्षकांनी ऑनलाईन शिक्षण पद्धतीसाठी आधुनिक शिक्षण पद्धतीचा व तंत्रज्ञानाचा अवलंब करणे ही काळाची गरज आहे,’ असे प्रतिपादन राज्याचे माजी शिक्षण संचालक एन. के. जरग यांनी केले.

येथील रयत शिक्षण संस्थेच्या आझाद कॉलेज ऑफ एज्युकेशन सातारा या शिक्षणशास्त्र महाविद्यालयात झूम अ‍ॅप आणि यू-ट्यूब लाईव्ह आयोजित करण्यात आलेल्या ‘शिक्षक दिन’ कार्यक्रमात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते.

जरग म्हणाले, ‘गुरू ब्रह्मा, गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्‍वरा:! गुरू साक्षात परब्रह्म तस्मै: श्री गुरवे: नमः ! शिक्षकांना वैदिक काळापासून गुरूचे स्थान आहे. शिक्षक हा समाजाचा निर्माण कर्ता आहे. छोट्या बालकापासून समाजातील तरुण-तरुणींचे उत्कृष्ट नागरिक म्हणून परिवर्तन करण्याचे कार्य शिक्षकाला करावयाचे असते. शिक्षकांच्या ऋणातून आपण कधीच मुक्त होऊ शकत नाही. आज शिक्षणाचे अवमूल्यन केले जात असल्याचे चित्र समाजात दिसत आहे. तसेच गुरू-शिष्य संबंधांमधील पवित्र भावना लोप पावत चाललेल्या दिसून येत आहेत. गुरू-शिष्य यांच्यामधील पावित्र्य कायम ठेवण्यासाठी आणि डॉ. राधाकृष्णन यांच्या स्मृती जागृत ठेवण्यासाठी ‘शिक्षक दिन’ संपूर्ण देशभर साजरा केला जातो. शिक्षक हा सामाजिक परिवर्तनामधील महत्त्वाचा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ, पुढारी, डॉक्टर, प्राध्यापक, इंजिनिअर, शास्त्रज्ञ तयार करण्याचे सामर्थ्य शिक्षकांमध्ये असते.’

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शिक्षणशास्त्र महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वंदना नलवडे होत्या. यावेळी महाविद्यालय विकास समितीचे सदस्य डॉ. आर. के. शिंदे, डॉ. विजय सुखटणकर, प्राचार्य शहाजी डोंगरे, माजी प्राचार्या नजमा मणेर, डॉ. एम. एल. जाधव, प्राचार्य बाबूराव दळवी, प्रा. एन. एन. सावंत, प्रा. चारुदत्त कदम, डा. के. डी. गायकवाड यांची प्रमुख उपस्थिती होती.

प्राचार्या डॉ. वंदना नलवडे म्हणाल्या, ‘आपल्या राष्ट्राची ध्येयधोरणे बळकट करण्यासाठी व देशाला अधिक बलशाली बनवण्यासाठी शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावतात. समाजातील अनेक पिढ्या घडवण्याचे काम करीत असताना राष्ट्रीय चारित्र घडवण्याचे कार्य आपण शिक्षकांनी अधिक सक्षमपणे करण्याचे आव्हान त्यांनी केले. देशाचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचे कार्य आपण मनापासून केले पाहिजे.’

याप्रसंगी प्राचार्या नलवडे यांनी सर्व गुरुजनांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या आणि भारताचे माजी राष्ट्रपती व थोर शिक्षणतज्ज्ञ डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण यांच्या जीवनातील महत्त्वाची तत्त्वे सांगितली.
महाविद्यालयातर्फे ऑनलाईन पद्धतीने साजरा करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे आजी-माजी प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.

सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. जी. एस. कांबळे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. ए. एस. गागरे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. ए. बी. पाटील यांनी आभार मानले.