जिल्ह्यात ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा
ना. शंभूराज देसाई यांच्या प्रशासनाला सूचना
‘जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.
सातारा : ‘जिल्ह्यात सध्या कोरोना संसर्ग रुग्णांचे प्रमाण वाढत आहे. कोणताही रुग्ण बेडपासून वंचित राहणार नाही, यासाठी जिल्ह्यातील ऑक्सिजन बेडची व व्हेंटिलेटरची संख्या वाढवा,’ अशा सूचना गृह (ग्रामीण) राज्यमंत्री ना. शंभूराज देसाई यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कोरोना संसर्गाचा आढावा गृह (ग्रामीण) राज्यमंत्री देसाई यांनी घेतला. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर जिल्हाधिकारी रामचंद्र शिंदे, प्रांताधिकारी मिनाज मुल्ला, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
कोरोना बाधित रुग्णांची संख्या पाहता रेमडेसिवीर औषधांचा अधिकचा पुरवठा जिल्ह्यासाठी व्हावा यासाठी शासनाला पत्र द्या, अशा सूचना करून गृह राज्यमंत्री देसाई म्हणाले, ‘सध्या जिल्ह्यात 3 हजार ऑक्सिजन बेड व 200 व्हेंटिलेटर आहेत. भविष्याचा विचार करून ऑक्सिजन बेड व व्हेंटिलेटरची संख्या वाढवली पाहिजे.
शासनाने लॉकडाऊन किंवा आणखीन कडक निर्बंध जाहीर केले तर त्यांच्या अंमलबजावणीसाठी गृह विभागाने मनुष्यबळ तयार ठेवावे. तसेच नागरिकांनी मास्कचा, वेळोवेळी सॅनिटायझरचा, सुरक्षित अंतर याचे पालन केले पाहिजे याबरोबरच गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळले पाहिजे, असे आवाहनही गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी शेवटी केले.