रामराजेंच्या वयाचे भान राखून मी गप्प; अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती
खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांचा सुरवडीतील पत्रकार परिषदेत घणाघाती आरोप
‘गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आलेले नाही, विकासकामाचा त्यांनी नुसता दिखावा केला असून, आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्याबदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती,’ असा घणाघाती आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.
फलटण : ‘गेल्या तीस वर्षांच्या कालावधीत मोठमोठी पदे मिळूनही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना फलटण तालुक्यात कोणतेही भरीव विकासकाम करता आलेले नाही, विकासकामाचा त्यांनी नुसता दिखावा केला असून, आपल्या हक्काचे पाणी बारामतीकरांना विकून त्याबदल्यात पदे भोगण्यात त्यांनी धन्यता मानली आहे. त्यांच्या वयाचे भान राखून मी गप्प आहे अन्यथा त्यांची जागा आतमध्ये असती,’ असा घणाघाती आरोप खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.
नुकताच रामराजे नाईक-निंबाळकर यांनी विरोधक विकासकामात अडथळा आणण्याचे काम करत असल्याचा आरोप पत्रकार परिषदेत केला होता. त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी सुरवडी येथे हॉटेल निसर्गमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
यावेळी माजी सनदी अधिकारी विश्वासराव भोसले, ‘भाजप’चे जिल्हा उपाध्यक्ष जयकुमार शिंदे, पंचायत समितीचे माजी सदस्य धनंजय साळुंखे-पाटील नगरसेवक अशोकराव जाधव, भाजप शहराध्यक्ष अमोल सस्ते आदी उपस्थित होते.
मी खासदार झाल्या-झाल्या एका महिन्याच्या आत बारामतीकरांनी पळवून नेलेले नीरा-देवघरचे पाणी पुन्हा फलटण माळशिरस तालुकाकडे वळविले होते. फलटण-लोणंद रेल्वे सुरू केली होती, नीरा-देवघर कालव्याची साठी तरतूद करतानाच नाईकबोमवाडी येथे नवीन एमआयडीसी मंजूर केली होती. या सर्व कामांना खोडा घालण्याचे काम रामराजे नाईक-निंबाळकर यांनी केले आहे, त्यांचे सरकार पुन्हा येताच बारामतीकरांनी नीरा-देवघर पाणी पुन्हा पळविले असून यावर चकार शब्द काढायला लाचारीमुळे रामराजे तयार नाहीत, असे खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
माझा स्वराज साखर कारखाना चांगला चालला असून, पुढील वर्षी तो पंधरा हजार मेट्रिक टन गाळप करणार आहे. खंडाळा तालुक्यात आंदोरी येथे मोठा प्रोसेसिंग कारखाना सुरू करीत असून आम्ही येथील श्रीराम व साखरवाडी कारखान्यात कधी राजकारण आणले नाही, मात्र आमच्या कारखान्याला अडचणीत आणण्याचे रामराजे यांनी सतत प्रयत्न केला आहे. साखरवाडी कारखाना कवडीमोल किमतीने दत्त इंडिया या कंपनीला रामराजेंनी देताना त्यामध्ये स्वतःची पार्टनरशीप घेतली असून ऊस उत्पादकांचे थकीत 26 कोटी रुपये जर दिले नाही तर साखरवाडी कारखान्याकडे मला माझ्या पद्धतीने लक्ष द्यावे लागेल, याची नोंद साखरवाडी कारखाना व्यवस्थापनाने घ्यावी, असा इशाराही खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.
फलटण शहरात आत्तापर्यंत सर्व निकृष्ट कामे होत असून, भुयारी गटार योजनेचे कामही निकृष्ट दर्जाचे सुरू आहे, या कामाची चौकशी झाल्याशिवाय डांबरीकरण करू नये, ही आमची मागणी आहे. कारण, डांबरीकरण केले आणि परत रस्ता खोदला तर डांबरीकरणाचा खर्च वाया जाणार असून डांबरीकरणाची कामेही कोणाच्या घशात घातली आहेत, हे जनतेला माहिती आहे. ठराविक ठेकेदारालाच कामे देऊन त्यातून स्वतःची घरे भरली जात आहेत यापुढे चुकीची कामे होऊ देणार नाही मी स्वतः आता सर्व कामात लक्ष दिले आहे. चुकीची कामे झाली तर कोणालाही माफी नाही तुम्ही काय काय केले, हे काढायला लावू नका तुमच्या वयाचे भान ठेवून मी गप्प आहे, अन्यथा तुमची जागा निश्चितच आत असती, असा इशाराही खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिला.
30 मार्चला फलटण-पुणे रेल्वेचा रेल्वेमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आदेशाने येत्या 30 मार्च रोजी फलटण-पुणे रेल्वे सेवेचा शुभारंभ रेल्वे मंत्री पीयुष गोयल यांच्या हस्ते होत आहे. आपण पाण्यासाठी संघर्ष केला म्हणून बारामतीला जाणारे 65 टक्के पाणी आता फलटणला मिळत आहे. रेल्वे, नीरा -देवधर, एमआयडीसी, रस्ते आदी विकासकामांबरोबरच तालुक्यासाठी एका वर्षात 76 कोटीचा निधी आपण आणलेला आहे. आगामी काळात फलटणचे विमानतळ विमानसुविधेसाठी कार्यरत करणार असल्याचेही यावेळी खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी स्पष्ट केले.
लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणीस विराजमान
सचिन वाझे प्रकरण आणि खुद्द राज्याच्या गृहमंत्र्यांवर मुंबई पोलीस आयुक्तांनी केले, याचे आरोप पाहता या सरकारला सत्तेवर राहण्याचा अधिकार नाही. निष्क्रिय सरकारामुळे जनतेचे हाल होत असून, या सरकारने ताबडतोब राजीनामा देऊन पाय उतार व्हावे, असे स्पष्ट करतानाच लवकरच महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदी देवेंद्र फडणीस विराजमान दिसतील, असा दावाही खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी केला.