निसर्गामध्ये आपल्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार वन्य प्राण्यांना आहे. माणसाला स्वार्थी समजले जाते. इथेही आपला स्वार्थ पहा. आपल्याला निसर्गात जगायचे असेल तर वन्य प्राण्यांनाही जगवा. बिबट्याला दुखवू नका मात्र त्याच्यापासून स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन सातारा तालुका वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले.
सातारा : निसर्गामध्ये आपल्याला जसा जगण्याचा अधिकार आहे तसाच अधिकार वन्य प्राण्यांना आहे. माणसाला स्वार्थी समजले जाते. इथेही आपला स्वार्थ पहा. आपल्याला निसर्गात जगायचे असेल तर वन्य प्राण्यांनाही जगवा. बिबट्याला दुखवू नका मात्र त्याच्यापासून स्वतःची काळजी घ्या, असे आवाहन सातारा तालुका वन परिक्षेत्र अधिकारी डॉ. निवृत्ती चव्हाण यांनी केले.
ठोसेघर, ता. सातारा येथील आदर्श माध्यमिक विद्यालयामध्ये सातारा तालुका वन विभागाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या वनवणवा प्रतिबंधक सप्ताह आणि बिबट्याच्या वावरासंदर्भात घ्यावयाची काळजी याबाबत आयोजित करण्यात आलेल्या मार्गदर्शन शिबिरात ते बोलत होते. सातारा पंचायत समितीचे माजी सदस्य शंकरआप्पा चव्हाण, उपसरपंच जयराम चव्हाण, बाबाराजे युवा मंचचे पठार विभाग अध्यक्ष प्रवीण चव्हाण, वनपाल प्रशांत पडवळ, वनविभागाचे कर्मचारी अशोक मलप, संतोष दळवी, सुहास मोरे, मुख्याध्यापक एस. डी. जाधव, बी. ए. पन्हाळकर, ए. आर. कदम, एस. आर. कदम उपस्थित होते.
निवृत्ती चव्हाण पुढे म्हणाले, सातारा तालुक्याच्या गेल्या ५० वर्षाच्या इतिहासाचा बिबट्याच्या हल्ल्यात एकाही नागरिकाचा बळी गेला नाही. उलट गेल्या पाच वर्षांमध्ये अपघातामध्ये ब्लॅक पॅंथरसह तीन बिबट्यांचा मृत्यू झाला. डोंगरी व दुर्गम भागात रानडुक्कर, हरण, भेकर यांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. बिबट्या हा प्राणी नष्ट झाला तर रानडुक्कर आपल्या घरापर्यंत यायला कमी करणार नाहीत. मुळात बिबट्या दुखावला गेला तरच नागरिकांवर हल्ला करतो. त्याला घाबरू नका मात्र त्याच्यापासुन काळजी घेण्याची गरज आहे. सहसा बिबट्या दिवसा आपल्या अधिवासआतुन बाहेर पडत नाही. अन्नाच्या शोधात तो रात्री बाहेर पडतो त्यामुळे रात्रीच्या वेळी शेतामध्ये काम करत असताना नागरिकांनी खबरदारी घेण्याची गरज आहे. ठोसेघर हा डोंगरी व दुर्गम भाग आहे. इथे विद्यालयीन शिक्षण घेण्यासाठी परिसरातील वाडीवस्ती व गावातून येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मोठी आहे. पायी चालत येत असताना उंच गवत, झाडे- झुडपे आणि जंगल सदृश्य परिस्थिती आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि विद्यार्थिनीनी येता-जाता आपली काळजी घेण्याची गरज आहे. शक्य असेल तेव्हा विद्यालयात येताना समूहाने चालत यावे- जावे.
डोंगरी भागामध्ये वन्यप्राण्यांची शिकार मोठ्या प्रमाणावर केली जाते, अशी एक चर्चा आहे. त्यासाठी वन विभागाच्या माध्यमातून अनेक प्रतिबंधक उपाययोजना करण्यात येत आहेत. सातारा वन विभागाच्या माध्यमातून गेल्या तीन वर्षांमध्ये अशा अनेक घटना उघडकीस आणण्यात यश आले आहे. वन्य प्राण्यांची शिकार करू नका. नाहीतर जेलमध्ये जावे लागेल. इथे उपस्थित असलेल्या प्रत्येक विद्यार्थी- विद्यार्थिनीने याबाबत आपल्या कुटुंबात जनजागृती करण्याची गरज आहे.
आदर्श माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना वन विभागाच्यावतीने पॉलीथीन पिशव्या मोफत दिल्या जातील. विद्यार्थ्यांनी बदाम, फणस, खैऱ्या यासारख्या बियांच्या माध्यमातून रोपे तयार करून २५ डिसेंबर पर्यंत विद्यार्थ्यानी दहा रोपटी तयार करून आपल्या घराच्या आसपास, शेताच्या बांधावर, वनविभागाच्या हद्दीत लावावीत असे आवाहन करून निवृत्ती चव्हाण यांनी बिबट्या हा आपला शेजारी आहे, तो निरुपद्रवी नाही असे सांगत जंगल, वन्यप्राणी वाचवणे हे आपल्या प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे नमूद केले.
वणवा मानवनिर्मित झाला : प्रशांत पडवळ
सुमारे ५० वर्षांपूर्वी वणवा हा नैसर्गिक होता. तो आता नैसर्गिक राहिला नसून मानव निर्मित झाला आहे. अडीच हेक्टर क्षेत्रामध्ये वणवा लागला तर त्यामध्ये हजारो कीटक वन्यप्राणी जळुन भस्मसात होतात. वणव्यामुळे नैसर्गिक झरे, नाले, ओढे, विहिरी यांचे पाणी उष्णतेमुळे कमी होते. त्यामुळे भविष्यात नैसर्गिक पाण्याचे स्तोत्र कमी होऊन पिण्याच्या पाण्याची वानवा निर्माण होऊ शकते. वणव्या संदर्भात अनेक अंधश्रद्धा आहेत, त्या कथित आहेत. त्यामुळे वणवा कोणीही लावू नये, असे आवाहन वनपाल प्रशांत पडवळ यांनी केले.
प्रारंभी मान्यवरांचे सत्कार विद्यालय व संयुक्त वन व्यवस्थापन समिती यांच्या मार्फत करण्यात आले. जयराम चव्हाण यांनी प्रास्ताविक केले.