sports

आरोग्यसंपन्न सातारा जिल्हा घडवण्याचा प्रशासनाचा संकल्प

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ मोहिमेंतर्गत विविध पोस्टर्सद्वारे सोशल मीडियावर लोकांना मार्गदर्शन

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवण्यामध्ये हातभार लावण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानेही आरोग्यसंपन्न सातारा जिल्हा घडवण्याचा संकल्प केलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

सातारा : ‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या शासनाच्या महत्त्वाकांक्षी मोहिमेंतर्गत आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडवण्यामध्ये हातभार लावण्यासाठी सातारा जिल्हा प्रशासनानेही आरोग्यसंपन्न सातारा जिल्हा घडवण्याचा संकल्प केलेला असल्याचे चित्र दिसून येत आहे.

याबाबत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या माध्यमातून कोरोना या संसर्गजन्य रोगापासून स्वतःचा व स्वतःच्या कुटुंबाचा बचाव करण्याबरोबरच समाजातील इतरांचाही बचाव करण्यासाठी विविध पोस्टर्सद्वारे सोशल मीडियावरती लोकांना मार्गदर्शन करून सकारात्मक प्रचार व प्रसार करण्यात येत आहे.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेंंतर्गत आम्ही आमच्या कुटुंबातील सदस्यांची प्राथमिक आरोग्य तपासणी करून सदरची माहिती आम्ही आरोग्य यंत्रणेला देणार आहे. तुम्ही स्वतः तपासणी करून तुमच्या तब्येतीची खरीखरी माहिती आरोग्य यंत्रणेला द्या आणि साथरोगापासून स्वतःबरोबरच स्वतःच्या कुटुंबाचा आणि इतरांचाही बचाव करा. आम्ही घेतली आमच्या कुटुंबाच्या आरोग्याची जबाबदारी व काळजी आणि तुम्ही? तुमची व तुमच्या कुटुंबाची जबाबदारी व काळजी. आरोग्यसंपन्न महाराष्ट्र घडविण्यासाठी आपली सर्वांची या राज्याचा नागरिक या नात्याने नैतिक जबाबदारी असल्याचे या उपदेशावरून स्पष्ट होते.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ या मोहिमेअंतर्गत सतत मास्कचा वापर करा, मास्क शिवाय घराबाहेर पडू नका, आपला हात साबणाने वारंवार स्वच्छ धुवा, हात धुण्याची सोय असलेल्या ठिकाणी उदाहरणार्थ प्रवासात सॅनिटायझरचा वापर करा, नाक तोंड डोळे यांना वारंवार स्पर्श करणे टाळा, ताप, सर्दी, खोकला, घसा दुखणे, धाप लागणे, खूप थकवा येणे अशी लक्षणे दिसल्यास त्वरित जवळच्या फिवर क्लिनिकमध्ये जाऊन तपासणी करा.

मधुमेह, हृदयविकार, किडनीचे आजार, लठ्ठपणा आदी असल्यास दररोज तापमान मोजावे व तापमान 98.7 डिग्री सेल्सिअस पेक्षा जास्त असल्यास त्वरित फिवर क्लिनिकमध्ये तपासणी करावी. सध्या सुरू असलेल्या या आजारावरील उपचार सुरू ठेवावेत, त्यात खंड पडू देऊ नये. डॉक्टरांच्याकडून नियमित तपासणी करून घ्यावी, सोशल डिस्टन्िंसगचे पालन करावे आदी सूचना सोशल मीडियावरील पोस्टरच्या माध्यमातून लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करण्यात येत आहे.

 

 

‘भित्यापोठी ब्रह्मराक्षस’ या म्हणीप्रमाणे रिपोर्ट पॉझिटिव्ह आला तरी घाबरून जाण्याचे कारण नाही. योग्य वेळी व योग्य पद्धतीने केलेल्या उपचाराने कोरोना हा संसर्गजन्य आजार निश्‍चितपणे बरा होतो, हे समाजातील उदाहरणावरून स्पष्ट झालेले आहे. तरणेबांड आहात, कुठलं लक्षण नाही, धडधाकट आहात, कुठली व्याधी नाही, तुमच्यासाठी बेस्ट ऑप्शन होम आयसोलेशन म्हणजे घरच्या घरी उपचार अशा प्रकारची मार्गदर्शक व उद्बोधक पोस्टर्स जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण सातारा यांनी सोशल मीडियावरती प्रसिद्ध करून या रोगापासून बचाव करण्यासाठी जनतेचे मार्गदर्शन व्हावे यासाठी चांगल्या पद्धतीने प्रचार व प्रसार केलेला दिसून येत आहे. आरोग्य संपन्न महाराष्ट्राबरोबरच आरोग्यसंपन्न सातारा जिल्हा निर्माण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने संकल्प केल्याचे चित्र दिसून येत आहे.