अवैध वाळू वाहतूक करणार्यांना पोलिसांचा दणका
वडूज पोलिसांची कारवाई; 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त
भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी सुशांत हणमंत कदम, विशाल कदम (दोन्ही रा. भुरकवडी), सचिन जाधव उर्फ टमाट्या (रा. वडूज) व वगैरे चार जणांवर वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वडूज : भुरकवडी-सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक करणार्यांवर वडूज पोलिसांनी कारवाई करून 5 लाख 10 हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तर याप्रकरणी सुशांत हणमंत कदम, विशाल कदम (दोन्ही रा. भुरकवडी), सचिन जाधव उर्फ टमाट्या (रा. वडूज) व वगैरे चार जणांवर वडूज पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलीस ठाण्यातून मिळालेली अधिक माहिती अशी की, भुरकवडी ते सिद्धेश्वर कुरोली रस्त्यावर अवैध वाळू वाहतूक होत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख यांना बातमीदारमार्फत मिळाली. त्या माहितीच्या आधारे पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर, पोलीस कॉन्स्टेबल नरळे, संदीप शेडगे, सागर बदडे आदी पोलीस कर्मचारी त्याठिकाणी पोहोचले.
दरम्यान रात्री 10:30च्या सुमारास एक लाल रंगाचा ट्रॅक्टर येताना पोलिसांना दिसला. त्यावेळी दोन इसम अंधाराचा फायदा घेऊन पळून गेले. दरम्यान, पोलिसांनी तो ट्रॅक्टर थांबवून चालकास गाडीत काय आहे, अशी विचारणा केली असता चालकाने वाळू असल्याचे सांगितले. याबाबत त्यास गौण खनिज वाळू वाहतूक करण्याचा परवाना असल्याची विचारणा केली असता त्याची परवानगी नसल्याचे सांगितले.
याबाबत वडूज पोलिसांत पोलीस हवालदार मारेकर यांनी तक्रार दिली आहे. या कारवाईत 5 लाख रुपये किमतीचा ट्रॅक्टर-ट्रॉली व 1 ब्रास वाळू व 5 हजार रुपयांचा मोबाईल असा एकूण 5 लाख 10 हजार रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.


