sports

फलटण तालुक्यात पावसामुळे बाजरीसह ऊस पीक भुईसपाट

नुकसान भरपाई देण्याची शेतकर्‍यांची मागणी

फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्‍याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.

आसू : फलटण तालुक्याच्या ग्रामीण भागात सलग दोन दिवस झालेल्या मुसळधार पावसाने शेतकर्‍यांची त्रेधातिरपीट उडाली. हातातोंडाशी आलेल्या ऊस पिकाचे अतोनात नुकसान झाल्याने यावर्षी शेतकर्‍याच्या उसाचा तोटा मोठ्या प्रमाणात होणार, त्यामुळे संबंधित विभागाने झालेल्या पिकाचे पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची मागणी शेतकर्‍यांमधून होत आहे.
 
फलटण तालुक्यातील नीरा पट्ट्यातील बागायती भागात गेल्यावर्षी योग्य पाऊस झाल्याने दरवर्षी पेक्षा यावर्षी ऊस योग्य पद्धतीने व वजनदार बनला होता. ऑक्टोबरमध्ये या भागात ऊस तोडणीला प्रारंभ होतो; परंतु दोन दिवसात मोठ्या प्रमाणात झालेला वारा व जोरदार पावसाने ऊस, मका, बाजरी व इतर पिके जमीनदोस्त झाली आहे. त्यामुळे शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास निसर्गाने हिसकावून नेल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

नीरा पट्टा म्हटले की, समोर उभा राहतो तो बागायती पट्टा. बागायती पट्ट्यात दमदार पाऊस मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतो. परंतु, सप्टेंबरमध्ये वळवाच्या पावसाने होत्याचे नव्हते केल्याने ऊस उद्ध्वस्त झाला आहे. त्यामुळे शेतकर्‍यांसमोर नवीन संकट उभे ठाकले आहे. फलटण पूर्व भागात यावर्षी गेल्या पाच दशकांपेक्षा मोठ्या प्रमाणात बाजरीचे पीक घेण्यात आले. योग्य वातावरण असल्याने बाजरीचे पीकही जोमात आले होते; परंतु जोरदार पावसाने ते पीक उद्ध्वस्त केले आहे. त्याचबरोबर भाजीपाला व इतर पिके उद्ध्वस्त झाल्याने बळीराजा दुखावला आहे.

फलटण तालुक्याच्या शेजारी असणार्‍या बारामती तालुक्यात संबंधित प्रशासकीय यंत्रणेने पंचनामा करण्याचे आदेश दिले आहेत. परंतु, फलटण तालुक्यात शेतकर्‍यांचे कोट्यवधीचे नुकसान होऊनही अद्याप पंचनामे केले नसल्याने त्वरित पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरी संघटनेचे कार्यकर्ते शिवाजीराव शेडगे यांनी केली आहे.