maharashtra

मानवाने सत्कर्म करून पुण्याईचा बॅलन्स ठेवावा

प.पू. राजनकाका देशमुख महाराज यांचे फलटणमध्ये प्रतिपादन

मानवी जीवनामध्ये सत्कर्म करून पुण्याईचा जर बॅलन्स तुमच्याकडे असेल तर जगात कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही. फक्त अहंकार अंगी येऊ देऊ नका. आयुष्यात प्रत्येकाला सुख समाधान आनंद मिळेल, असे प्रतिपादन परम पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.

फलटण : मानवी जीवनामध्ये सत्कर्म करून पुण्याईचा जर बॅलन्स तुमच्याकडे असेल तर जगात कोणीही तुमचे वाकडे करू शकत नाही. फक्त अहंकार अंगी येऊ देऊ नका. आयुष्यात प्रत्येकाला सुख समाधान आनंद मिळेल, असे प्रतिपादन परम पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी केले.
श्री स्वामी समर्थ महाराजांचा 167 वा प्रकट दिन निमित्ताने श्री स्वामी समर्थ सेवा मंडळ, बुधवार पेठ, शिवाजी रोड फलटणच्यावतीने नवलबाई मंगल कार्यालय येथे विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी प. पूज्य राजनकाका देशमुख महाराज बोलत होते.
या कार्यक्रमास व्यसनमुक्त संघटनेचे प पू धैर्यशीलभाऊ देशमुख, प पू नवनाथ महाराज(शेरेचिवाडी) हे उपस्थित होते.
श्री स्वामी समर्थ हे नाम सातत्याने घेतल्यास जी प्रचिती येईल ती अद्भुत असेल. भगवंतपेक्षा भगवंताचे नाम मोठे आहे, हे भगवंतांनी सांगितले आहे. नामामुळे वाल्याचा वाल्मिकी झाला होता. त्यामुळे कलियुगात जर तुम्हाला यशस्वी व्हायचे असेल तर नामशिवाय पर्याय नाही. आजच्या कलियुगात पण भगवंताचा शेवटचा अवतार हा श्री स्वामी समर्थ महाराजांचा आहे. त्यांच्यानंतर कोणी झाला नाही, असे देशमुखमहाराज यांनी सांगितले.
भगवंताची नित्य सेवा करीत चला. जो मनोभावे आई वडिलांची सेवा करेल, कोणाचे मन दुखावणार नाही, अशांच्या पाठीशी मी असणार आहे हे स्वामींनी सांगितले असून आजच्या युगात राग, द्वेष ही भावना अनेकांच्या मनात वाढत चालली असल्याबद्दल प पूज्य राजनकाका देशमुख महाराज यांनी खंत व्यक्त करून तरुण पिढीने आई वडिलांचे मन दुखावू नये त्यांची आणि भगवंताची सेवा करावी, तुमचे निश्चित कल्याण होईल, असे आवाहन केले.