फलटण तालुक्यात लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना राबवाव्यात
अ. भा. राष्ट्रीय काँग्रेसची प्रांतांकडे निवेदनाद्वारे मागणी
फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना प्रभावीरितीने राबवाव्यात, या प्रमुख मागणीचे निवेदन अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटणच्या वतीने प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले.
फलटण : फलटण शहर व तालुक्यात वाढता कोरोना प्रादुर्भाव लक्षात घेऊन प्रशासनाने लॉकडाऊन न करता अन्य उपाययोजना प्रभावीरितीने राबवाव्यात, या प्रमुख मागणीचे निवेदन अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस पक्ष फलटणच्या वतीने प्रांताधिकारी तथा इन्सिडंट कमांडर डॉ. शिवाजीराव जगताप यांना देण्यात आले.
निवेदनातील माहिती अशी की, फलटणमधील व्यापारी, व्यावसायिक, लघुउद्योजक, हातगाडीवाले, रोजंदारीवर उपजीविका करणारे या सारख्या असंख्य नागरिकांवर लॉकडाऊनमुळे उपासमारीची वेळ येत असल्याचे गतवर्षी वाढत्या कोरोना प्रादुर्भाव कालावधीत स्पष्ट झाले आहे, म्हणून आता पुन्हा लॉकडाऊन सर्वांच्या दृष्टीने त्रासदायक ठरणारा असल्याचे निदर्शनास आणून देत लॉकडाऊन न करण्याची विनंती निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
प्रांताधिकारी यांना अ. भा. राष्ट्रीय काँग्रेस फलटणच्या वतीने निवेदन देताना काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अमीरभाई शेख, शहराध्यक्ष पंकज पवार, तालुका उपाध्यक्ष अशोकराव शिंदे, युवक काँग्रेस तालुकाध्यक्ष अजिंक्य कदम, फलटण शहर युवक अध्यक्ष प्रितम जगदाळे, सोपानराव जाधव, रामचंद्र जाधव उपस्थित होते.


