माणपूर्व भागातील शेतकर्यांचे तहसीलदारांना निवेदन
मागण्या मान्य न झाल्यास रास्ता रोकोचा इशारा
दुष्काळाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी अवकाळीने फटकारलेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर न दिल्यास सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा निर्धार वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकर्यांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत माणच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
वरकुटे-मलवडी : दुष्काळाच्या विश्रांतीनंतर मागील वर्षी अवकाळीने फटकारलेल्या अतिवृष्टीची नुकसान भरपाई, पीक विमा, नियमितपणे कर्ज भरणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर भत्ता लवकरात लवकर न दिल्यास सातारा-पंढरपूर रस्त्यावर रास्ता रोको करण्याचा निर्धार वरकुटे-मलवडी पंचक्रोशीतील शेतकर्यांच्या बैठकीत घेण्यात आला. याबाबत माणच्या तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.
वरकुटे-मलवडी येथील मारूती मंदिरात आयोजित करण्यात आलेल्या बैठकीस सरपंच बाळकृष्ण जगताप, अंकुश गाढवे, निवृत्त डीवायएसपी दत्तात्रय सोनवणे, माजी सरपंच जालिंदर खरात, भारत अनुसे, विजयकुमार जगताप, बापूराव बनगर, सचिन होनमाने, सुनील थोरात आदी पंचक्रोशीतील शेतकरी उपस्थित होते.
मागील वर्षी अतिवृष्टीमुळे वरकुटे-मलवडी, बनगरवाडी, महाबळेश्वरवाडी, कुरणेवाडी, शेनवडी परिसरातील शेतकर्यांचे अतोनात नुकसान झाले. शासकीय पातळीवर पंचनामेही करण्यात आले. मात्र, अद्याप कोणत्याच शेतकर्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत. त्याबरोबरच शेतकर्यांनी भरलेला पीक विमाही मिळालेला नाही. आणि नियमितपणे कर्जाची परतफेड करणार्या शेतकर्यांना प्रोत्साहनपर भत्ता 50 हजार शासनाने जाहीर केला असताना आजपर्यंत एकाही शेतकर्याच्या खात्यावर पैसे जमा झाले नाहीत.
मार्च महिन्याच्या अखेरीस सोसायटीच्या नियमानुसार कर्ज नियमित करावयाचे असल्याने, काय करावे? या विवंचनेत शेतकरी सापडला आहे. यावर शासनाने ताबडतोब निर्णय न घेतल्यास रास्ता रोको करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
माण तालुक्याच्या पूर्व भागातील शेतकर्यांची परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे.आर्थिक परिस्थितीने खचलेल्या शेतकर्यांचे प्रत्येकवेळी कोणत्यातरी कारणामुळे नुकसान होत आहे. आणि वेळेत नुकसान भरपाई मिळत नाही. शासनाकडून शेतकर्यांची अवहेलना होत असल्याने पंचक्रोशीतील शेतकर्यांनी एकमताने रास्ता रोकोचा निर्णय घेतला आहे.
- भारत अनुसे, माजी सरपंच, बनगरवाडी, ता. माण.