maharashtra

स्वच्छ सर्वेक्षण आणि कचरामुक्त शहरांमध्ये कराड, पाचगणीची बाजी

दिल्लीत आज पुरस्कार वितरण : जिल्ह्यातील ७ शहरांना ३ स्टार रँकिंग

Karad, pachgani baji in clean survey and waste free cities
केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि कचरामुक्त शहरे सर्वेक्षणमध्ये जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांनी बाजी मारली आहे. या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला.

कराड : केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्यमंत्रालयाद्वारे घेण्यात आलेल्या स्वच्छ सर्वेक्षण 2021 आणि कचरामुक्त शहरे सर्वेक्षणमध्ये जिल्ह्यातील कराड आणि पाचगणी या शहरांनी बाजी मारली आहे. या शहरांना स्वच्छ सर्वेक्षण 2021 अंतर्गत देशपातळीवर पुरस्कार जाहीर झाला. शनिवार दि. 20 रोजी दिल्ली येथील विज्ञान भवनात पुरस्कार वितरण समारंभ संपन्न होणार आहे.
कराड नगरपालिकेला मिळालेला हा सन्मान स्वीकारण्यासाठी कराड नगरपालिकेच्या नगराध्यक्षा रोहिणी शिंदे, आरोग्य सभापती विजय वाटेगावकर, आरोग्य अभियंता आर. डी. भालदार, अभियंता ए. आर. पवार, नगरसेविका स्मिता हुलवान सन्मान सोहळ्यात सहभागी होणार आहेत.
जिल्ह्यातील सातारा, मलकापूर, महाबळेश्वर, पाचगणी, वाई, रहिमतपूर, कराड या ७ शहरांनादेखील कचरा मुक्त शहरे (GFC) चे ३ स्टार रँकिंग प्राप्त झाले असून यासाठी केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी कार्य मंत्रालयाद्वारे या शहरांना पुरस्कृत करण्यात येणार आहे. या यशाबद्दल जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी नगरपालिकांचे नगराध्यक्ष, मुख्याधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि नागरिकांचे अभिनंदन केले आहे.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कराड व पाचगणी शहरात घरगुती कचरा हा  वेगळा केला जातो. ओला, सुका, घातक आणि प्लास्टिक तसेच घातक व सॅनिटरी कचरा, ई-कचरा विलगीकृत  केला जातो.  कचरा विलागिकरणाचे प्रमाण हे 100 टक्के आहे. शहरातील नागरिकही स्वत: घरच्या घरी किचन वेस्ट पासून खत तयार करतात.
स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत नगरपालिकेमार्फत घरोघरी जाऊन वर्गीकरण केलेला ओला व सुका कचरा 100 टक्के संकलित केला जातो. प्लॅस्टीक बंदीबाबत प्रभावी अंमलबजावणी करताना नागरिकांना पुर्नवापरयोग्य कापडी पिशव्या उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. शहरातील जुन्या कचऱ्यावर 100 टक्के शास्त्रोक्त प्रक्रिया केली जाते. नागरिकांमध्ये ओला व सुका कचरा वर्गीकरणाचे महत्त्व पटवून देण्यासाठी विविध मोहिमा राबविण्यात आल्या. कचरा डेपोमध्ये येणाऱ्या सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याचे पुनर्वापर करण्यात येते. नगरपरिषदेमार्फत ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करून त्यापासून सेंद्रिय खत निर्मिती केली जाते.