अमेरिकन लष्करी अळीच्या जीवनक्रमाची माहिती घेतल्यास संभाव्य नुकसान टाळणे शक्य
राहुल कांबळे यांचे मत; वीरकरवाडीत मका पिकाची शेतीशाळा संपन्न
‘मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊन शेतकर्यांनी वेळीच उपाययोजना केली तर या अळीचा प्रादुर्भाव रोखणे व मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते,’ असे मत कृषी सहायक राहुल कांबळे यांनी व्यक्त केले.
वरकुटे : ‘मका पिकावरील अमेरिकन लष्करी अळीच्या जीवनक्रमाची माहिती घेऊन शेतकर्यांनी वेळीच उपाययोजना केली तर या अळीचा प्रादुर्भाव रोखणे व मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळणे शक्य होते,’ असे मत कृषी सहायक राहुल कांबळे यांनी व्यक्त केले.
कृषी खात्यामार्फत क्रॉपसॅप अंतर्गत वीरकरवाडी येथे आयोजित केलेल्या मका पिकाचे अचूकरीत्या संगोपन करून निर्धारित उत्पन्नाबाबत निवडक शेतकर्यांच्या शेतीशाळेतील शेतकर्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते.
मका पिकास योग्य जमीन, माती परीक्षण, पाणी परीक्षण, पेरणी पूर्व शेतजमिनीची मशागत, बीज प्रकिया, पीक वाढीस पाण्याच्या पाळ्या, रासायनिक खतांचा समतोलपणे व आवश्यक तोच अचूकरीत्या वापर, पीक वाढीच्या अवस्थेत संभाव्य किडीचा प्रादुर्भाव, कीड रोखण्यासाठी आवश्यकतेनुसार कीटकनाशकांची फवारणी, विशेषत: अमेरिकन लष्करी अळीचा संभाव्य प्रादुर्भाव रोखण्यासाठी घेण्याची काळजी, लष्करी अळीचा प्रादुर्भाव झालाच तर मका पिकाचे संभाव्य नुकसान टाळण्यासाठी उपाययोजना व लष्करी अळीच्या जीवनक्रमाची अचूक माहिती उपस्थित शेतकरी बांधवांना कांबळे यांनी दिली.
या शेतीशाळा वर्गात शेतकर्यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांची समाधानकार उत्तरे देऊन गरज भासेल तेव्हा शेतकर्यांनी तातडीने तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी अथवा वैयक्तिक माझ्याशी संपर्क साधल्यास आणखी मार्गदर्शन केले जाईल, असे आश्वासनही त्यांनी दिले.
यापूर्वी बीज प्रकिया, दशपर्णी अर्क तयार करणे, जीवामृत तयार करणे, पिकावरील रोगांचा अभ्यास करून अचूकरीत्या आवश्यक त्या कीटकनाशकांची फवारणी आदी बाबतच्या प्रात्यक्षिकांचे शेतकर्यांच्या शेतीशाळेचे सात वर्ग माण तालुका कृषी अधिकारी प्रकाश पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व मंडळ कृषी अधिकारी सदाशिव बनसोडे यांच्या सहयोगाने घेतले असुन, याचा फायदा शेतकरी बांधवांना होऊन त्यांच्या शेतातील पीक उत्पादन वाढीस मदत झाली असल्याचीही माहिती कांबळे यांनी दिली.
या शेतकरी शेतीशाळेस कृषिमित्र राधेश वीरकर, शंकर वीरकर, विठ्ठल ढाके, मच्छिंद्र वीरकर, वासुदेव सोकासने, मारुती वीरकर, रवींद्र वीरकर, मधुकर सोकासने, वस्ताद घटुकडे, तुकाराम सजगाने आदी 25 शेतकरी उपस्थित होते.


