sports

विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्यांवर प्रशासनाची कारवाई

प्रांताधिकारी, तहसीलदारांनी जप्त केली वाहने : वाहने राहणार सात दिवस जप्त

सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून प्रशासन हा संसर्ग रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहे. जिल्ह्यात कडक लॉकडाऊन असल्याने अत्यावश्यक कामाव्यतिरिक्त कोणी बाहेर पडू नयेत अशा सूचना आहेत. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळल्यास आपणाला कारवाईला सामोरे जावे लागणार आहे. - किरण जमदाडे, तहसीलदार खटाव ( वडूज )
सध्या कोरोनाचा संसर्ग वाढत असल्याने जिल्ह्यातील लॉकडाऊन कडक केला आहे. मात्र काही जण विना कारण रस्त्यावर घिरट्या घालत असल्याचे प्रशासनाच्या निदर्शनास आले. यानंतर खटावचे प्रांत श्री कासार, तहसीलदार किरण जमदाडे यांनी स्वतः रस्त्यावर येऊन अशा लोकांवर कारवाईचा बडगा उगारला आहे. शहरात फिरणाऱ्या दुचाकी, चारचाकी वाहनांवर दंड करत काही वाहने सात दिवसासाठी जप्त करण्यात आली आहेत. याबाबत अधिक माहिती अशी आज वडुज शहरात प्रांत कासार, आणि तहसीलदार किरण जमदाडे यांनी मुख्य चौकात थांबून पोलीस प्रशासनाला सोबत घेऊन रस्त्यावर फिरणाऱ्यांकडे चौकशी केली. यामध्ये विनाकारण बाहेर पडणाऱ्यावर दंडात्मक कारवाई केली. तर काही वाहनधरकांची वाहने ताब्यात करून पोलीस ठाण्यात जप्त केली आहेत. ही वाहने सात दिवसांसाठी जप्त करण्यात आली असल्याची माहिती तहसीलदार किरण जमदाडे यांनी सांगितली. या वेळी वडूज पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख, पोलीस उपनिरीक्षक शीतल पालेकर, वाहतूक कर्मचारी, श्री काळे, श्री लोखंडे, यांच्या सह गृहरक्षक दलाचे जवान या कारवाईत सहभागी झाले होते. आज करण्यात आलेल्या कारवाईत १५ दुचाकी, २ चार चाकी वाहने सात दिवसांसाठी जप्त करण्यात आली आहेत. तर एका चार चाकी वाहनात प्रमाणापेक्षा जास्त लोकांची वाहतूक केली जात असल्याचे दिसून आल्यानंतर त्या वाहनधारकवर ३ हजार रुपयांचा दंड करण्यात आला आहे.