मोठी दुर्घटना ः वांग नदीच्या पाण्यात बुडून आजी, नातवाचा मृत्यू
सात वर्षाच्या मुलीने वाचविले पित्याचे प्राण
By esahas.com web team Sun 7th Mar 2021 07:44 am
कराड ः कराड तालुक्यातील कोळेवाडी-अंबवडे येथे वांग नदीच्या पुलावरून पाण्यात दुचाकीसह पडल्याने चौघे बुडाल्याची दुर्घटना घडली. यामध्ये आजी व नातवाचा बुडून मृत्यू झाला असून सात वर्षाच्या मुलीने पित्याचे प्राण वाचविले. शनिवारी रात्री 7 च्या सुमारास ही दुर्घटना घडली. या घटनेमुळे येरवळे परिसरावर शोककळा पसरली आहे. मालन भगवान यादव (वय 57), पियुष शरद यादव (वय 4, रा. येरवळे ता. कराड) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्यांची नावे आहेत. याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, येरवळे ता. कराड येथील शरद भगवान यादव हे आपली आई मालन, मुलगी तनुजा व मुलगा पियुष यांच्यासह शनिवारी रात्री 7 च्या सुमारास अंबवडे येथून देवदर्शन करून परतत असताना अंबवडे-कोळेवाडी येथे वांग नदीवरील जुन्या पुलाचे काम सुरू होते. याठिकाणी बांधकामाचे साहित्य व खडी पसरलेली होती. या खडीवरुन दुचाकी घसरल्याने दुचाकीसह चौघेही नदीच्या पात्रात पडले. यावेळी सात वर्षाच्या तनुजा हिला पोहता येत असल्याने तिने सर्वांना वाचविण्याचा प्रयत्न केला. यामध्ये वडील शरद यांना तिने सुखरूप बाहेर काढले. मात्र नजीकच बंधारा असल्याने नदीची पाणी पातळी खोल होती. यामुळे आजी व भाऊ हे खोल पाण्यात बुडाल्याने त्यांना वाचविता आले नाही. या दुर्घटनेमुळे येरवळे परिसरावर शोककळा पसरली आहे.