sports

सातारा नगरपालिकेला लवकरच हद्दवाढ क्षेत्राचा निधी प्राप्त होईल

खा. उदयनराजे भोसले यांची माहिती : ना. एकनाथ शिंदे यांच्याकडे सादर केला विकास आराखडा

नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेने हद्दवाढ क्षेत्राचा 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला असून, याबाबत आम्ही मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे लवकरच सातारा नगरपरिषदेकडे याकामी निधी प्राप्त होईल,’ अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सातारा : नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेने हद्दवाढ क्षेत्राचा 51 कोटी रुपयांचा विकास आराखडा सादर केला असून, याबाबत आम्ही मंत्र्यांशी सविस्तर चर्चा केली आहे. ना. एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या अभिवचनाप्रमाणे लवकरच सातारा नगरपरिषदेकडे याकामी निधी प्राप्त होईल,’ अशी माहिती खा. उदयनराजे भोसले यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे दिली आहे.

सातारा नगरपरिषदेच्या विविध प्रश्‍नांवर नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांची खा. उदयनराजे भोसले यांनी भेट घेऊन हद्दवाढ क्षेत्राचा विकास आराखडा, नावीन्यपूर्ण योजनेतून नवीन प्रशासकीय इमारतीच्या बांधकामासाठी निधी, कासची उंची वाढवण्याच्या कामाला निधी तसेच कासच्या बंदिस्त पाईपलाईनकरिता निधी, कर माफीबाबत राज्य शासनाची मान्यता, नवीन विद्युत दाहिनी आदी मुद्द्यांवर चर्चा केली. 

खा. उदयनराजे यांनी दिलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, नगरपरिषदेच्या सुमारे 40 ते 50 वर्षामध्ये पहिल्यांदाच सप्टेंबर 2020 मध्ये हद्दवाढ झाली आहे. हद्दवाढ क्षेत्रातील खेड, गोडोली, विलासपूर, शाहूपुरी, करंजे, दरे खुर्द, कोडोलीचा काही भाग, शाहूनगरमधील आणि गोडोलीचा त्रिशंकू भाग येथील सुमारे 160 किमी लांबीचे रस्ते, 17 किमी लाबीची गटर्स/पाईपड्रेन, पोलसह सुमारे 100 स्ट्रीट लाईटस, याकरीता तसेच या परिसरातील ओपन स्पेसचा विकास, फाशीचा वड,चारभिंती, अजिंक्यतारापरिसर, तलाव आदी ठिकाणी नवीन बागा, ओपन जीम, ठिकठिकाणी वृक्षारोपण आदी अनेक विकास कामांचा आराखडा तयार करण्यात आलेला आहे. सदर 51 कोटी 41 लाख रुपयांचा आराखडा राज्याचे नगरविकास मंत्री ना. एकनाथ शिंदे यांना नगरपरिषदेच्या वतीने सादर करण्यात आला.

नगरपरिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीकरीता 1 रुपयामध्ये पद्मश्री बाबासाहेब कल्याणी यांचेकडून नगरपरिषदेने सुमारे 40 गुंठे जागा खरेदी केलेली आहे. सदर जागेवर प्रशासकीय इमारत उभारण्यात येणार आहे. त्याकरिता राज्यशासनाने वैशिष्यपूर्ण,  नावीन्यपूर्ण योजनेमधून सातारा नगरपरिषदेला भरीव निधी प्रदान करावा, अशी आग्रही मागणीही यावेळी ना. शिंदे यांच्याकडे करण्यात आली. यावर ना. एकनाथ शिंदे यांनी याच महिन्याच्या अखेरीस प्रशासकीय इमारतीसाठी निधीचा पहिला टप्पा मंजूर करुन वितरीत केला जाईल, असे सांगितले. त्यामुळे प्रशासकीय इमारतीचे बांधकामास यावर्षी सुरुवात  करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

सातारकरांना वरदान ठरलेल्या, जिव्हाळ्याचा कास धरण उंची वाढवण्याच्या प्रकल्पाला राज्य शासनाकडून मंजूर झालेला निधीची रक्कम तातडीने मिळावी, तसेच कास बंदिस्त पाईपलाईनद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे त्यास मंजूरी आणि निधी मिळावा अशी मागणी केली असता, यावर्षापासून दरवर्षी टप्याटप्याने निधी देण्याचे मान्य केले आहे. 

माहुली येथे कोरोना काळात अंत्यसंस्कार होण्यास वेळ लागत होता, त्यासाठी याठिकाणी विद्युत दाहिनी बसवण्याकामीचा प्रस्ताव ना. एकनाथ शिंदे यांना प्रस्ताव दिला असता, त्यास ना. एकनाथ शिंदे यांनी तातडीने मंजुरी दिली आहे. त्यामुळे लवकरच याठिकाणी विद्युत दाहिनी बसवली जाणार आहे. राजवाडा येथील जुन्या नगरपालिका कार्यालयामध्ये आर्ट गॅलरीचे प्रस्तावास ना. एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

सातारा शहरासाठी मंजूर दुसरी सुधारीत विकास योजना सुधारीत करणे तसेच सातारा नगरपरिषदेच्या हदद्यदवाढीत नव्याने समाविष्ट झाालेल्या क्षेत्रासाठी विकास योजना,  जीआयएस प्रणालीद्वारे करण्याकरिता येणारा खर्च शासनाने करणेबाबत प्रस्तावित केलेले आहे. हा खर्च शासनाने करणे गरजेचे आहे व तो खर्च शासनाने करावा अशी मागणी खा. उदयनराजे भोसले यांनी केली. याबाबतही ना. शिंदे यांनी यावेळी मंजूरी दिल्याने, याकामाचा संपूर्ण खर्च राज्य शासन करणार आहे. 

कोव्हिडच्या लॉकडाउनच्या काळात, आकारण्यात येणारी  निवासी आणि बिगरनिवासी घरपटटी माफ करण्याचा ठराव नगरपरिषदेने पारित केला आहे, त्यास शासनाची मंजूरी मिळण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. त्यावर ना. एकनाथ शिंदे यांनी राज्य शासन लवकरात लवकर निर्णय घेईल सांगितले. त्यामुळे लॉकडाउनकाळातील घरपटटीचा प्रश्‍न लवकरच सुटणार आहे. सातारा शहराची हद्यवाढ झाल्याने उपलब्ध कर्मचारी यांच्यामार्फत नागरी सुविधा पुरवणे अशक्य होत असल्याने, सातारा नगरपरिषदेमध्ये नवीन पदनिर्मिती करून, जागा भरण्याच्या प्रस्तावासही ना. एकनाथ शिंदे यांनी मंजुरी दिली आहे.

अशा प्रकारे सातारा नगरपरिषदेच्या विविध विषयांवर ना. एकनाथ शिंदे यांच्याबरोबर केलेल्या चर्चेत, सातारा नगरपरिषदेस राज्य शासनामार्फत सर्वतोपरी सहकार्य केले जाईल तसेच विविध प्रस्ताव, आराखडे, मागणी यांच्या पूर्ततेसाठी भरीव निधी देण्याचे अभिवचन ना. एकनाथ शिंदे यांनी दिले आहे. त्यामुळे हद्दवाढ क्षत्रातील विकास, नवीन प्रशासकीय इमारत, कास-सातारा पाईपलाईन, विद्युत वाहिनी, आर्ट गॅलरी, पदनिर्मिती आदी कामांना लवकर भरीव निधी प्राप्त होणार असून, सातारा शहर व हद्यवाढ भागाचा विकास झपाटयाने होण्यास मदत होणार आहे असेही खा. उदयनराजे भोसले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात शेवटी नमूद केले आहे.