वनवासवाडीतील विस्तारित कक्षाचा नागरिकांना लाभ होईल
मिलिंद पाटील यांचे प्रतिपादन; वनवासवाडी प्रभागातील प्रशासकीय विस्तारित कक्षाचे लोकार्पण
‘खेड ग्रामपंचायतीने वनवासवाडी प्रभागात ग्रामविकासाला गती देण्याच्या उद्देशाने बांधलेल्या प्रशासकीय विस्तारित कक्षाचा कृष्णानगर, वनवासवाडी, विकासनगर या भागातील सुमारे दहा ते बारा हजार नागरिकांना लाभ होणार असून, या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी ग्रामपंचायतीने पूर्ण केली आहे,’ असे प्रतिपादन मिलिंद पाटील यांनी केले.
सातारा : ‘खेड ग्रामपंचायतीने वनवासवाडी प्रभागात ग्रामविकासाला गती देण्याच्या उद्देशाने बांधलेल्या प्रशासकीय विस्तारित कक्षाचा कृष्णानगर, वनवासवाडी, विकासनगर या भागातील सुमारे दहा ते बारा हजार नागरिकांना लाभ होणार असून, या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी ग्रामपंचायतीने पूर्ण केली आहे,’ असे प्रतिपादन मिलिंद पाटील यांनी केले.
खेड ग्रामपंचायतीने वनवासवाडी प्रभागातील अष्टविनायक कॉलनी, वाई अर्बन बँकेच्या शेजारील जागेत बांधलेल्या प्रशासकीय विस्तारित कक्षाच्या लोकार्पण कार्यक्रमात ते बोलत होते.
यावेळी पंचायत समितीचे माजी सभापती मिलिंद कदम, पॅनेलचे अध्यक्ष सुजित पवार, सरपंच विजय शिंदे, ग्रामपंचायत सदस्य इंदिरा बोराटे, दत्ता माने, जितेंद्र शिवदास, विजयाताई कांबळे, सुशीला कांबळे यांची प्रमुख उपस्थिती होती.
पाटील म्हणाले, ‘कृष्णानगर, वनवासवाडी, विकासनगर, सत्यमनगर, संगमनगर व त्या अंतर्गत येणार्या गृहनिर्माण सोसायटी, लोकवस्तीमधील नागरिकांना येथील प्रशासकीय विस्तारित कक्षामध्ये विविध शासकीय योजनांचे ऑनलाईन दाखले, करभरणा, ग्रामस्थांच्या तक्रारी, अडचणी तसेच केंद्र व राज्य शासनाच्या विविध उपक्रमांची माहिती एकाच छताखाली उपलब्ध होणार आहे. यामुळे नागरिकांना मुख्य कार्यालयाकडे जाण्याचा त्रास कमी होणार असून, या भागातील नागरिकांची अनेक वर्षांची मागणी सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी पूर्ण केली आहे.’
सुजित पवार म्हणाले, ‘विस्तारित कक्षामुळे या भागाच्या सर्वांगीण विकासाला मोठी भरारी घेण्याची दिशा मिळणार असून, खातेदारांच्या वेळ व श्रमाची बचत होणार आहे.आ. शशिकांत शिंदे व आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली ग्रामविकासाला अधिक गती व चालना देताना ग्रामस्थांच्या वैयक्तिक विकासासाठी काम करणारे गाव म्हणून खेड ग्रामपंचायत जिल्ह्यासाठी दिशादर्शक ठरेल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
यावेळी मिलिंद कदम, सरपंच विजय शिंदे, दत्ता माने, अनघा कारखानीस, सिराजभाई मुल्ला यांनी मनोगत व्यक्त केले.
या कार्यक्रमास ग्रामपंचायत सदस्य तसेच अष्टविनायक कॉलनी, गुरूदत्त कॉलनी, संगमनगर, कृष्णानगर, विकासनगर, सत्यमनगर, परिसरातील नागरिक उपस्थित होते.
दिलीपराव कांबळे यांनी प्रास्ताविक करून सूत्रसंचालन केले. ग्रामविकास अधिकारी डी. डी. गायकवाड यांनी आभार मानले.


