कृषी विभागाच्या योजनांचा सर्वसामान्य शेतकर्यांचा लाभ द्यावा
ना. बाळासाहेब पाटील यांच्या सूचना : कृषी विभागाची आढावा बैठक संपन्न
‘कृषी विभाग हा शेतकर्यांसाठी असणारा विभाग आहे. या विभागामार्फत ज्या-ज्या योजना शेतकर्यांसाठी राबविल्या जातात, त्या प्रभावीपणे राबवून याचा लाभ गरजू शेतकर्यांना द्यावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
सातारा : ‘कृषी विभाग हा शेतकर्यांसाठी असणारा विभाग आहे. या विभागामार्फत ज्या-ज्या योजना शेतकर्यांसाठी राबविल्या जातात, त्या प्रभावीपणे राबवून याचा लाभ गरजू शेतकर्यांना द्यावा,’ अशा सूचना पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांनी केल्या.
जिल्हाधिकारी कार्यालयातील परिषद सभागृहात कृषी विभागाकडून राबविण्यात येणार्या विविध योजनांच्या अंमलबजावणीबाबत आढावा बैठक पालकमंत्री ना. पाटील यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.
या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी गुरुदत्त काळे, ‘आत्मा’चे प्रकल्प संचालक अशोक देसाई, कृषी उपसंचालक विजयकुमार राऊत, पाणी चळवळीचे कार्यकर्ते डॉ. अविनाश पोळ, कृषी विभागातील अधिकारी व शेतकरी उपस्थित होते.
कृषी विभागाकडून शेतकर्यांना औजरांचे वाटप केले जाते, त्या औजारांचा वापर होतो का नाही याची पाहणी कृषी विभागाने करावी, अशा सूचना ना. पाटील यांनी केल्या.
काळ्या गव्हाच्या लागवडीला प्रोत्साहन द्या
जिल्ह्यात काही ठिकाणी नव्या जातीचा काळा गहू लागवड केला आहे. हा गहू आरोग्यासाठी लाभदायक असून, याचा दरही अधिक आहे. या काळ्या गव्हाची विक्री आपल्या जिल्ह्यात करून अधिकाधिक शेतकर्यांना या काळ्या गव्हाची लागवड करण्यासाठी कृषी विभागाने प्रवृत्त करावे. या गव्हाचे फायदे काय आहेत, याची नागरिकांमध्ये जनजागृती करावी.
शासनाने विकेल ते पिकेल ही शेतकर्यांसाठी योजना सुरू केली आहे. या योजनेच्या माध्यमातून शेतकर्यांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यात येत आहे. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकर्यांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही त्यांनी या बैठकीत केले.
या बैठकीत उपस्थित शेतकर्यांनी पालकमंत्री ना. पाटील यांच्या समोर शेती करत असताना येणार्या अडचणी मांडल्या, या अडचणी सोडविण्याचे आश्वासनही त्यांनी या बैठकीत दिले.


