फलटणमध्ये संचारबंदीच्या अनुषंगाने पोलीस, महसूल व पालिका प्रशासनाचे संचलन
नागरिकांनी संचारबंदीच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन
फलटण शहर आणि तालुक्यात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरात संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाच्या नियमांची अंमलबजावणी बाबत आवाहन करण्यात आले.
फलटण : फलटण शहर आणि तालुक्यात संचारबंदीच्या पहिल्या दिवशी कुठं शुकशुकाट तर कुठं वर्दळ असल्याचे चित्र पाहावयास मिळाले. त्यामुळे संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन, महसूल व नगरपालिका यांच्या संयुक्त विद्यमाने फलटण शहरात संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाच्या नियमांची अंमलबजावणी बाबत आवाहन करण्यात आले.
राज्यातील कोरोनाची साखळी तोडण्यासाठी राज्यात बुधवारी रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. केवळ अत्यावश्यक सेवेतील नागरिकांनाच बाहेर पडण्याची मुभा आहे. यामुळे एकप्रकारे राज्यात लॉकडाऊन लागू झाला आहे. संचारबंदीचा आजचा पहिला दिवस असल्याने नागरिकांकडून त्याला चांगला प्रतिसाद मिळाला. ग्रामीण भागातील ग्रामस्थांनी सुद्धा फलटण शहरात न येणे पसंत केले होते. शंकर मार्केट, सुपर मार्केटमध्ये सोशल
डिस्टन्िंसगचा फज्जा उडालेला होता. पहाटे मॉर्निंग वॉकसाठी विमानतळावर आलेल्या नागरिकांना पोलिसांनी हुसकावून लावले.अत्यावश्यक सेवेत नसलेली दुकाने चोरमार्गाने सुरू असल्याचे दिसत होते.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जाहीर करण्यात आलेल्या संचारबंदी आदेशाच्या अनुषंगाने पोलीस प्रशासन महसूल व नगरपालिका यांच्यातर्फे संचलन करून नागरिकांना संचारबंदी आदेशाच्या नियमांची अंमलबजावणीबाबत आवाहन करण्याकरिता महात्मा फुले चौक, डेक्कन चौक, महावीर स्तंभ, छ. शिवाजी महाराज चौक, रविवार पेठ, उमाजी नाईक चौक, गजानन चौक असे संचलन करण्यात आले.
यावेळी फलटणचे उपविभागीय अधिकारी शिवाजी जगताप, पोलीस उपअधीक्षक तानाजी बरडे, पोलीस निरीक्षक भारत किंद्रे, फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांंची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी महसूल, पोलीस व नगरपालिका कर्मचारी संचलनात सहभागी झाले होते.
सातारा जिल्ह्यातील कोरोना विषाणूचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सातारा जिल्ह्यात क्रिमीनल प्रोसिजर कोडचे कलम 144 नुसार मनाई आदेश लागू केले आहेत. या आदेशास फलटण तालुक्यातील जनतेने सकारात्मक प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक भारत किंद्रे यांनी केलेले आहे.
या आदेशास टाळाटाळ केल्यास अथवा विरोध दर्शविल्यास संबंधितांच्या विरुद्ध यथास्थिती आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51, भारतीय साथरोग अधिनियम 1897 व भारतीय दंड संहिता (45 ऑफ 1860) कलम 188 नुसार दंडनीय व कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असे किंद्रे यांनी स्पष्ट केले.