सतर्क नागरिकांनी दरोड्याचा प्रयत्न हाणून पाडला
तिघांना चोप देवून केले पोलिसांच्या हवाली : दोघे पसार
सातारा : कोरोनाची माहिती द्या आम्ही वैद्यकिय पथकातून आलो आहोत. असे सांगत घरामध्ये घुसून दरोडा टाकण्यासाठी पुण्यातून सातार्यात आलेल्या तिघांना सतर्क नागरिकांनी चोप देऊन पोलिसांच्या ताब्यात दिले. तर त्यांचे इतर दोन साथीदार पसार झाले. ही घटना शुक्रवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास रविवार पेठेत घडली.
गत दोन दिवसांपासून पाचजणांचे टोळके रविवार पेठेत संशयितरित्या फिरत होते. शुक्रवारी सकाळी नेहमीप्रमाणे एक महिला आणि दोन पुरुष हातात पिशवी घेऊन फिरत होते. हा प्रकार काही नागरिकांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांना नागरिकांनी हटकलं. मात्र, तरीसुद्धा संबंधित व्यक्ती त्याच ठिकाणी घुटमळत होत्या. काही जागृत नागरिकांनी त्यांच्याजवळ जाऊन त्यांची विचारपूस केली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे नागरिकांना संशय आला. त्यांच्या पिशवी तपासली असता त्यामध्ये एअरगन आणि गुंगी देण्यासाठी असणारा क्लोरोफॉर्म आढळून आला. त्यामुळे नागरिकांचा संशय खरा ठरला.
संतापलेल्या नागरिकांनी संबंधित दरोडेखोरांना चांगलाच चोप दिला. बघ्यांची गर्दी झाल्यानंतर अनेकांनी या प्रकाराचे व्हिडिओ चित्रीकरण केले. त्यानंतर सातारा शहर पोलिसांना याची माहिती देण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन एक महिला आणि दोन पुरुषांना ताब्यात घेतले. संबंधित तिघे एकाच कुटुंबातील असल्याचे समोर आले आहे. या टोळक्यांचे आणखी दोन साथीदार असून ते फरार झाले आहेत. हे सर्वजण पुण्यातील असून, दरोड्याच्या उद्देशानेच सातार्यात आले आहेत, असे पोलीस निरीक्षक आण्णासाहेब मांजरे यांनी सांगितले. रात्री उशिरापर्यंत संबंधितांवर गुन्हा दाखल झाला नव्हता.


