थकीत वेतन दर अनुदानासाठी बेमुदत शाळा बंद आंदोलन करणार
कोल्हापूर विभाग शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात यांचा इशारा
By esahas.com web team Sat 19th Dec 2020 12:48 pm
मलकापूर : महाराष्ट्र राज्य शिक्षण संस्था महामंडळ कोल्हापूर विभागातील संस्थाचालकांची सभा श्री मळाई देवी शिक्षण संस्था मलकापूर कराड येथे आयोजित केली होती .या सभेत वेतनेतर अनुदान मिळाल्यास पुढील महिन्यात बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला. 2000 सालापासून वेतनेतर अनुदान बंद करण्यात आले आहे विद्यार्थी केंद्रबिंदू मानून शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी वेतनेतर अनुदान आवश्यक आहे .परंतु शासनाची याबाबत अनास्था असल्याने शाळा चालवणे आव्हान बनले आहे असे मत माननीय शिवाजीराव माळकर यांनी मांडले. कोल्हापूर विभाग शिक्षण संस्था महामंडळाचे उपाध्यक्ष अशोकराव थोरात म्हणाले गेल्या वीस वर्षात शिक्षण क्षेत्राकडे बघण्याचा शासनाचा दृष्टिकोन बदलला आहे .त्यामुळे शिक्षण क्षेत्रात अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. शासन स्तरावर घेतले जाणारे निर्णय संस्थाचालकांचे मत विचारात न घेता घेतले जातात. वेतनेतर अनुदान बंद केल्यामुळे शाळांमध्ये अनेक सुविधांचा अभाव निर्माण होईल. त्यामुळे गुणवत्ता ढासळेल, मुलांचे आरोग्य धोक्यात येईल. समाजातील भावी पिढी घडवण्याचे काम करण्याच्या शिक्षण संस्थांना हतबल करून शासनाला नेमके काय साध्य करावयाचे आहे. शिक्षण क्षेत्रात घेतले जाणारे अनेक चुकीचे निर्णय समाजविघातक आहेत त्यामुळे गोरगरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील मुले शिक्षणापासून वंचित राहतील .स्वयंअर्थसहाय्यित किंवा इंग्रजी माध्यमांच्या शाळांमधील अवाढव्य मुले शिकणार? गोरगरिबांची मुले या शाळेत शिकत आहेत या शाळांचे वेतनेतर अनुदान बंद केल्यास त्यांना सुविधा कशा पुरवायच्या ? त्यातच चतुर्थश्रेणी कर्मचारी भरती कंत्राटी पद्धतीने करण्याचे धोरण राबविल्यास अनेक समस्या निर्माण होतील. त्यातच ग्रामीण व शहरी भागातील कंत्राटी पद्धतीच्या कर्मचाऱ्यांचे मानधन भिन्न आहे .तसे कर्मचारी नेमून त्यांच्याकडून काम करून घेणे आव्हानात्मक आहे .कारण चतुर्थ श्रेणीतील पदे नष्ट करून एका व्यक्तीने ही सर्व कामे करणे कसे शक्य होईल. शिक्षक भरती बंद आहे त्यातच आता चतुर्थ-श्रेणी-कर्मचारी ही नसतील तर शाळा चालवायच्या कशा ? शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे आणि ते केल्याने माणूस गुरु करतो पण या शिक्षणापासून भावी पिढीला दूर ठेवायचे का ? या सर्व गोष्टीवर शासनाने विचार करावयाला हवा व आपल्या निर्णयात बदल करावा अन्यथा पुढील महिन्यात बेमुदत शाळा बंद आंदोलन करण्यात येईल. असा सूचक इशाराही देण्यात आला. या प्रसंगी अमर दादा पाटणकर , बालवडकर सर गुरव , चंद्र धारूरकर सचिन सूर्यवंशी यांनी आपले मनोगत व्यक्त केले .या बैठकीत एस.टी सुकरे यांनी प्रास्ताविक केले . आर. डी. पाटील यांनी सूत्रसंचालन केले तर पाटील यांनी आभार मानले.