sports

भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर

संजीवराजे नाईक-निंबाळकर यांचे मत : फलटण येथील मलनि:स्सारण केंद्राचे भूमिपूजन

‘फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

फलटण : ‘फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेमुळे फलटण शहराच्या वैभवात भर पडलेली आहे. भूमिपूजन करत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामुळे फलटण तालुक्यातील शेजारी व सर्वसामान्य नागरिकांना वापरायचे पाणी उपलब्ध होणार आहे,’ असे मत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांनी व्यक्त केले.

भुयारी गटार योजनेंंतर्गत शिवाजीनगर, फलटण येथील मलनि:स्सारण केंद्राचे भूमिपूजन संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाले. याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी उपनगराध्यक्ष नंदकुमार भोईटे, माजी नगराध्यक्ष पांडुरंग गुंजवटे, नगरसेवक अजय माळवे, किशोरसिंह नाईक-निंबाळकर, सनी अहिवळे, नगरसेविका ज्योत्स्ना शिरतोडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

संजीवराजे पुढे म्हणाले, ‘विधान परिषदेचे सभापती व आपल्या सर्वांचे नेते ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या प्रयत्नांमधून फलटण नगरपालिकेच्या माध्यमातून फलटण शहरास भुयारी गटार योजना मंजूर झालेली होती. भुयारी गटार योजनेचे काम करत असताना नक्कीच नागरिकांना थोड्या प्रमाणावर अडचणींचा सामना करावा लागत आहे. परंतु, भुयारी गटार योजनेचे संपूर्ण कामकाज पूर्ण झाल्यानंतर फलटण मधील नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागणार नाही. सन 1991 पासून ना. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली आपण सर्वांनी फलटण शहरासह तालुक्याचा विकास साधण्यामध्ये आपल्याला यश आलेले आहे. आगामी काळात सुद्धा हा विकासाचा रथ अविरत पुढे न्यायचा आहे,’ असेही संजीवराजे यांनी स्पष्ट केले.

शिवाजीनगर परिसरात भूमिपूजन होत असलेल्या मलनि:स्सारण केंद्रामध्ये 2.5 एमएलडी एवढ्या वर प्रक्रिया केली जाणार आहे. या सोबतच शेती शाळा येथे सुद्धा दुसरे मलनि:स्सारण केंद्र होणार आहे. त्यामध्ये 5.5 एमएलडी एवढ्या वर प्रक्रिया केली जाणार आहे. दोन्ही मलनि:स्सारण केंद्रांवर प्रक्रिया करून येथील प्रक्रिया केलेले पाणी शेतीला व घरगुती वापरासाठी दिले जाणार आहे. फलटण शहरात सुरू असलेल्या भुयारी गटार योजनेचे काम 76 किलोमीटर पैकी 42 किलोमीटरचे कामकाज पूर्ण झालेले आहे. मे 2021च्या अखेर सर्व काम पूर्ण करण्याचा मानस असून, भुयारी गटार योजनेचे काम जिथे-जिथे पूर्ण झालेले आहे, तिथे नंतर रस्त्याची कामे त्वरित सुरू करण्यात आलेली आहेत, अशी माहिती नगरसेवक पांडुरंग गुंजवटे यांनी दिली.