sports

कोरोनाच्या शिरकावाने पाचगणी पालिका कार्यालय कुलूपबंद


पाचगणी नगरपालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पालिका कार्यालय गेल्या दहा दिवसांपासून कुलूपबंद झाले आहे. तर कार्यालयीन कामकाज  ठप्प झाल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.

पाचगणी : पाचगणी नगरपालिका कार्यालयात कोरोनाचा शिरकाव झाल्याने पालिका कार्यालय गेल्या दहा दिवसांपासून कुलूपबंद झाले आहे. तर कार्यालयीन कामकाज  ठप्प झाल्याने अनेक प्रश्‍न निर्माण झाले आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, पाचगणी गिरिस्थान नगरपालिकेच्या एका महिला नगरसेविकेचा 30 जुलै रोजी कोरोना चाचणीचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने एकच खळबळ उडाली. सदर नगरसेविका पालिकेच्या सर्वसाधारण सभेला हजर होत्या. त्यामुळे अनेकांचे धाबे दणाणले. काही नगरसेवक स्वतःहून क्वारंटाइन झाले. पालिका प्रशासनाने लागलीच सर्व कार्यालय औषध फवारणी करून निर्जंतुकीकरण करून घेतले.
दुसर्‍या दिवशी पालिकेतील दोन कार्यालयीन कर्मचारी ही कोरोनाबाधित झाल्याचे रिपोर्ट आल्याने आणखी गुंता वाढला. संसर्ग वाढतो की काय अशी भीती निर्माण झाली. इतर कर्मचार्‍यांनाही क्वारंटाइन करण्यात आले. आणि नगरपालिकेचे कामकाज थांबवण्यात आले. नंतर एका कर्मचार्‍याचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आणि मोठा गहजब झाला. शेवटी पालिकेचे कामकाज बंद करण्यात आले असून, पालिकेच्या बहुतांश कर्मचार्‍यांना क्वारंटाइन केले आहे. कार्यालय बंद असल्याने नागरिकांची कामे ही ठप्प झाली आहेत. कोरोनाच्या भीतीने नागरिकही पालिकेकडे फिरकण्यास धजावत नाहीत. 

नगरपालिकेचे कर्मचारी पॉझिटिव्ह आल्याने बरेचसे कर्मचारी क्वारंटाइन केले आहेत, परंतु पालिकेचे कामकाज थांबवले नसून गरजेनुसार कर्मचारी जाऊन काम करीत आहेत.
- गिरीश दापकेकर, मुख्याधिकारी, पाचगणी नगरपालिका