'चला हवा येऊ द्या'च्या सेटवर उदयनराजे यांची हवा
घोस्ट रायडर बाईक वर स्वार राजेंची हवेतून थरारक एन्ट्री
आपल्या हटके स्टाईल साठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर उदयनराजे यांनी मोटार बाईकवर स्वार होत थेट साठ फूट उंच हवेतून स्टेजवर एन्ट्री केली. राजेंच्या या थरारक एंट्रीला सातारकरांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.
सातारा : आपल्या हटके स्टाईल साठी प्रसिद्ध असलेले साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनी आपला हटके अंदाज पुन्हा एकदा दाखवून दिला. त्यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषदेच्या मैदानावर आयोजित 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाच्या सेटवर उदयनराजे यांनी मोटार बाईकवर स्वार होत थेट साठ फूट उंच हवेतून स्टेजवर एन्ट्री केली. राजेंच्या या थरारक एंट्रीला सातारकरांनी टाळ्या वाजवून जोरदार प्रतिसाद दिला.
गेल्या आठवडाभरापासून आधी छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यानंतर त्यांचे तेरावे वंशज खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त साताऱ्यात सातत्याने विविध कार्यक्रम सुरू आहेत. उदयनराजे भोसले मित्र समूहाच्या वतीने जिल्हा परिषदेच्या मैदानावर डॉक्टर निलेश साबळे आणि त्यांच्या कलाकारांचा सुप्रसिद्ध 'चला हवा येऊ द्या' हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. डॉक्टर निलेश साबळे यांच्या नर्मविनोदी सूत्रसंचालना सह इतर कलाकारांचा फर्मास विनोद यामुळे कार्यक्रम रंगत चालला होता.
कार्यक्रम सुरू झाल्यानंतर तासाभराने अगदी हटके स्टाइल मध्ये खासदार उदयनराजे भोसले यांची 60 फूट उंचीवर असणाऱ्या बाईक वरून उदयनराजे यांची खास शैलीत एन्ट्री झाली. बाईकच्या दोन्ही बाजूने जोरदार फायर वर्क्स सुरू होते या एन्ट्री ची समस्त सातारकरांनी टाळ्या वाजवून नोंद घेतली. कधी शिट्टी, कधी कॉलर, कधी गाणे, तर कधी एखादा हटके अंदाज अशासाठी प्रसिद्ध असणाऱ्या उदयनराजे यांनी पुन्हा एकदा सातारकरांची मने जिंकली.
चला हवा येऊ द्या च्या सेटवर मध्यंतरामध्ये उदयनराजे यांची हवा दिसून आली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉक्टर निलेश साबळे यांनी सुद्धा उदयनराजे यांच्याशी संवाद साधत त्यांना बोलते केले. साताऱ्यात एका कार्यक्रमात अभिनेत्री श्वेता शिंदे व अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या उपस्थितीत उदयनराजे यांनी पुष्पा चित्रपटाचा प्रसिद्ध डायलॉग मारला होता. तोच डायलॉग मारण्याची साबळे यांनी उदयनराजे यांना विनंती केली. 'पुष्पराज हु मै झुकेगा नही साला' स्टाईल बाज डायलॉग उदयनराजे यांनी मारल्यानंतर सातारकरांनी पुन्हा एकदा टाळ्यांचा प्रचंड कडकडाट केला. उदयनराजे काय रसायन आहे याची पुन्हा एकदा या निमित्ताने प्रचिती आली. उदयनराजेंचा या फायर ब्रँड एण्ट्रीची जिल्ह्याच्या राजकारणात आणि उदयनराजे प्रेमींमध्ये जोरदार चर्चा झाली.