छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे : प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव
कृष्णा फौंडेशन शैक्षणिक संकुल वाठार येथे शिवजयंती उत्साहात साजरी
By esahas.com web team Wed 24th Feb 2021 10:05 am
कराडः छत्रपती शिवाजी महाराजांचे व्यवस्थापन कौशल्य जगाला आदर्शवत व प्रेरणादायी असून युवा पिढीने याचा अभ्यास करणे गरजेचे असून छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्याचा वापर करून विद्यार्थ्यांनी यशस्वी व्हावे असे मत वक्ते प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव यांनी व्यक्त केले. वाठार ता. कराड येथील कृष्णा फौंडेशनच्या जयवंत इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट वाठार येथे शिवजयंती निमित्त ऑनलाइन आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा. नवनीत नंदकुमार यशवंतराव बोलत होते. यावेळी बोलताना पुढे म्हणाले विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून जर विचार केला तर छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तुत्व, नेतृत्व व व्यवस्थापन कौशल्य विचारात घेणे गरजेचे आहे. अखंड हिंदुस्थानाला एक आदर्श घालून देतात ते छत्रपती शिवाजी महाराज आज व्यवस्थापनाचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना कळणे महत्त्वाचे आहे. शिवाजी द मॅनेजमेंट गुरु हा संपूर्ण अभ्यासक्रम शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर मध्ये समाविष्ट करण्यासाठी प्रयत्न केल्याबद्दल कृष्णा फौंडेशनचे कार्यकारी संचालक डॉ. विनोद बाबर सर यांचे त्यांनी आभार मानले. कोणतीही गोष्ट ज्यावेळेस घडते ती सहज घडत नाही. त्यावेळी त्याच्या पाठीमागील संघर्ष विचारात घेणे गरजेचे आहे. पंधराव्या वर्षी स्वराज्याची शपथ घ्यावी. आपल्याबरोबर अठरापगड जाती, बारा बलुतेदार घेऊन रायरेश्वराच्या पिंडी वरती रक्ताचा अभिषेक घालावा व स्वराज्याच्या निर्मितीस सुरुवात करावी. हा विचार ज्या वेळी आपल्या मनामध्ये येतो त्यावेळेस त्यातील नियोजन व व्यवस्थापन कौशल्य समजून घेणे गरजेचे आहे, ज्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज स्वराज्य निर्माण करण्यात यशस्वी झाले. मॅनेजमेंट म्हणजे लोकांना आपल्या बरोबर घेऊन त्यांच्याकडून काम करून घेणे. त्यांच्यातील गुण ओळखून प्रत्येकाला त्यांच्या गुणांनुसार काम देता आले, त्यांच्या जबाबदारीची जाणीव करून देता आली तर व्यवस्थापन सोपे होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे आपल्या मावळातील गुण ओळखून प्रत्येकाला जबाबदारी दिली यावरून त्यांचे व्यवस्थापन कौशल्य आपण समजू शकतो. जसे शिवाजी महाराजांनी प्रत्येक मावळ्याच्या मनामध्ये स्वराज्य निर्माण करण्याची भावना निर्माण केली. विद्यार्थ्यांनी मॅनेजर म्हणून कंपनीमध्ये काम करताना याचा वापर केला तर ते नक्कीच यशस्वी होतील. छत्रपती शिवाजी महाराजांनी जसे त्यांच्या योग्य क्षमतेचा वापर करून स्वराज्य निर्माण केले. त्याचप्रमाणे कृष्णा फौंडेशन मधील विद्यार्थ्यांनी योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. प्रत्येक गोष्ट करत असताना आपला उद्देश डोळ्यासमोर ठेवून त्यानुसार काम केले पाहिजे. तरच तुम्ही आयुष्यामध्ये यशस्वी होऊ शकता. प्रत्येक गोष्ट योग्य वेळी करण्याची व सातत्य राखण्याची गरज आहे. योग्य वेळी योग्य निर्णय कसे घ्यायचे व आपला उद्देश कसा साध्य करायचा हे छत्रपती शिवाजी महाराजांच्या व्यवस्थापन कौशल्यातून विद्यार्थ्यांना शिकता येईल. कार्यक्रमाचे प्रास्ताविक निशा जाधव यांनी तर आभार प्रदर्शन पुजा माने यांनी केले. या ऑनलाईन व्याख्यानात संस्थेचे सर्व अध्यापक वअन्य कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.