sports

जावली तालुक्यातील मार्ली घाटात अज्ञात  महिलेचा मृतदेह आढळला

तालुक्यात एकच खळबळ; घटनेचा छडा लावण्याचे पोलिसांसमोर आव्हान 

जावली तालुक्यातील मार्ली घाटात वीस दिवसांपूर्वी पुरुष जातीचा एक अज्ञात मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. असे असतानाच आज त्याच जागेपासून काही अंतरावर दुसरा मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. हा सिरीयल किलिंगचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत जनतेतून संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.

कुडाळ : जावली तालुक्यातील मार्ली घाटात वीस दिवसांपूर्वी पुरुष जातीचा एक अज्ञात मृतदेह आढळला होता. या मृतदेहाची अद्याप ओळख पटलेली नाही. असे असतानाच आज त्याच जागेपासून काही अंतरावर दुसरा मृतदेह आढळल्याने तालुक्यात खळबळ माजली आहे. हा सिरीयल किलिंगचा प्रकार आहे की आत्महत्या याबाबत जनतेतून संशय व्यक्त होत आहे. या घटनेचा छडा लावण्याचे मोठे आव्हान पोलिसांपुढे आहे.
या महिन्यात 11 ऑगस्ट रोजी पोलिसांना मार्ली घाटात एक मृतदेह आढळला होता. गेल्या वीस दिवसांत या मृतदेहाची ओळख पटलेली नाही. किंवा तालुक्यातील कोणी हरवल्याची तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झालेली नाही. त्यामुळे लोकांची फारशी वर्दळ नसणार्‍या या घाटात नेमकं काय घडतंय याबाबतची चर्चा लोकांमधून व्यक्त केली जात आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहिती अशी की, मार्ली घाटात आज एक मृतदेह सडलेल्या अवस्थेत असल्याची माहिती मिळाली, त्यानुसार कुडाळ पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस उपनिरीक्षक सूर्यकांत शिंदे व करहर पोलीस ठाण्यातील हवालदार डी. डी. शिंदे व सहकारी घटनास्थळी दाखल झाले. यावेळी सदर स्त्री जातीचा मृतदेह सडलेल्या अवस्थेत पडला असल्याचे दिसून आले. याबाबतची माहिती मिळताच अतिरिक्त पोलीस अधीक्षक धीरज पाटील, वाईचे उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके, मेढ्याचे प्रभारी पोलीस निरीक्षक घटनास्थळी दाखल झाले. 
त्याठिकाणी मृतदेहाच्या मुंडक्याची कवटी धडावेगळी पडली होती. मृतदेह कुजलेल्या अवस्थेत असल्याने शीर तोडून महिलेला मारून टाकण्यात आले की जंगली प्राण्यांनी शीर ओरबडले याबाबत साशंकता आहे. सदर महिलेच्या अंगावर साडी व स्वेटर घातलेला आहे. या मृतदेहाचे जागेवरच शवविच्छेदन करण्यात आले. हा मृतदेह पंधरा ते वीस दिवसांपूर्वीचा असावा, असा अंदाज असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले.
दरम्यान, एका महिन्यात सलग दुसरी घटना आणि ठिकाण जवळपास तेच आणि घटना घडलेच्या दिवसांचा ताळमेळ पाहता या दोन्ही व्यक्ती एकमेकांच्या परिचित असण्याची शक्यता सुद्धा घटनास्थळी लोकांकडून वर्तवली जात होती.त्यामुळे या घटनेचा शोध घेण्याचे मोठे आव्हान मेढा पोलिसांपुढे आहे. 
या घटनेचा अधिक तपास कुडाळ पोलीस ठाण्याचे पोलीस उपनिरीक्षक संतोष चामे यांच्या मार्गदर्शनाखाली करहर पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार डी. डी. शिंदे करत आहेत.