sports

वैद्यकीय व्यवसायात सेवाभावाला मोठे महत्व : खासदार पाटील

वडूजला जयश्री हॉस्पिटल व कोव्हिड सेंटरचे उदघाटन

मातृभूमीशी ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी... वैद्यकीय पदवी घेतल्यानंतर शहरी भागांत वैद्यकीय व्यवसायाच्या चांगल्या संधी होत्या, मात्र आपल्या ग्रामीण भागाशी असणारी नाळ कायम ठेवण्याचे संस्कार आई वडीलांनी दिले होते. त्यामुळे आपल्या मातृभूमीशी असणारे ऋणानुबंध कायम ठेवण्यासाठी अवघ्या ३० दिवसांत हॉस्पिटल व कोव्हिड सेंटरची उभारणी करण्यात आली असल्याचे डॉ. सचिन साळुंखे यांनी सांगितले.

वैद्यकीय क्षेत्रातील लोकांनी गोरगरिबांशी नाळ जोडून सेवाभाव जपल्यास यश नक्की मिळेल, असे प्रतिपादन खा. श्रीनिवास पाटील यांनी केले. वडूज ता.खटाव येथील डॉ. सचिन साळुंखे यांनी उभारलेल्या जयश्री हॉस्पिटलच्या व कोव्हिड सेंटरच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी माजी आमदार डॉ. दिलीप येळगावकर, जिल्हा परिषद उपाध्यक्ष प्रदीप विधाते, जिल्हा बँकेचे संचालक अनिल देसाई, माजी सभापती संदीप मांडवे, पोलीस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख, प्रातांधिकारी जर्नादन कासार, तहसीलदार किरण जमदाडे, डॉ. बी.जे. काटकर,डॉ. संतोष मोरे, विविध अधिकारी व मान्यवर उपस्थित होते. यावेळी बोलताना खा. पाटील म्हणाले, कलेढोणसारख्या दुर्गम गावातून आलेल्या डॉ. सचिन साळुंखे यांनी वैद्यकीय शिक्षण घेतल्यावर आपल्या तालुक्‍यातील लोकांना चांगल्या आरोग्य सुविधा मिळाव्यात म्हणून वडूजला हॉस्पिटल सुरू केले आहे. त्यांचा सेवाभाव उल्लेखनीय असून, असा सेवाभाव इतर डॉक्‍टरांनीही जपावा. कोरोनाच्या काळात खटाव तालुक्‍यात सुसज्ज हॉस्पिटलची गरज होती. ऑक्‍सिजनचे तीस बेड्‌स असलेले डॉ. साळुंखे यांचे हॉस्पिटल रुग्णांसाठी संजीवनी ठरेल. डॉ. साळुंखे म्हणाले, वैद्यकीय शिक्षण घेत असतानाच मातीतल्या माणसांसाठी हॉस्पिटल उभारण्याचा संकल्प केला होता. गेली अनेक वर्षे या क्षेत्रात काम करताना तळागाळातल्या लोकांच्या वेदना समजून घेता आल्या. करोना काळात तालुक्‍यातील लोकांना चांगले उपचार मिळणे गरजेचे वाटले. त्यामुळे सातारा शहरात जम बसला असतानाही आपल्या खटाव तालुक्यातील ग्रामीण भागांतील लोकांना चांगल्या आरोग्य सेवा देण्यासाठी प्रयत्नशिल राहू. यावेळी डॉ. येळगावकर, संदीप मांडवे आदींनी मनोगत व्यक्त केले. प्रसाद जगदाळे यांनी सूत्रसंचालन केले. डॉ. संतोष मोरे यांनी आभार मानले.