sports

वेबिनार संवादात रंगला महावितरणमधील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी गौरव सोहळा

सातारा जिल्ह्यातील 28 जनमित्रांचा गौरव

उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात देखभाल व दुरुस्ती करणार्‍या महावितरणच्या बारामती परिमंडलच्या सन 2019-20 मधील उत्कृष्ट 28 तांत्रिक कर्मचार्‍यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. 15) स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.

सातारा : उत्कृष्ट ग्राहकसेवा, सुरळीत वीजपुरवठा, वीजवाहिन्या व उपकेंद्रांची विनाअपघात देखभाल व दुरुस्ती करणार्‍या महावितरणच्या बारामती परिमंडलच्या सन 2019-20 मधील उत्कृष्ट 28 तांत्रिक कर्मचार्‍यांना स्वातंत्र्यदिनानिमित्त शनिवारी (दि. 15) स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले.
महावितरणमधील उत्कृष्ट यंत्रचालक, तंत्रज्ञ या तांत्रिक कर्मचार्‍यांना दरवर्षी महाराष्ट्र दिन व कामगार दिनी गौरविण्यात येते. मात्र, कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे यंदा हा कार्यक्रम स्वातंत्र्यदिनी वेबिनारच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला. 
या कार्यक्रमात मुख्य अभियंता सुनील पावडे यांच्यासह अधीक्षक अभियंता चंद्रशेखर पाटील (बारामती), ज्ञानदेव पडळकर (सोलापूर), भाऊसाहेब इवरे (इन्फ्रा), सुनीलकुमार माने (सातारा), सहायक महाव्यवस्थापक प्रदीप सातपुते, सर्व कार्यकारी अभियंते, अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते.
पुरस्कारप्राप्त कर्मचार्‍यांना त्यांच्या संबंधित मंडल, विभागीय कार्यालयात गौरविण्यात आले. या कर्मचार्‍यांसह यंदाच्या ‘निसर्ग’ चक्रीवादळात जिगरबाज कामगिरी करणारे आणि पुणे प्रादेशिकस्तरावर ‘कोरोना वीजयोद्धा’ म्हणून निवड झालेल्या तांत्रिक कर्मचार्‍यांसह अभियंता व अधिकारी यांनी वेबिनारद्वारे मनमोकळा संवाद साधला. अनेकांनी ‘एक गाव एक दिवस’ उपक्रमातील कामांचे महत्त्व सांगितले तर काही ज्येष्ठ कर्मचार्‍यांनी अनुभवातून ग्राहकसेवेचे महत्त्व अधोरेखित केले. काहींनी ‘निसर्ग’बाधित वीजदुरुस्तीच्या विविध प्रसंगांचे थरार सांगितले तर वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर गावकर्‍यांनी भावूकतेने केलेले कौतुकही अनेकांनी आपुलकीने नमूद केले.
मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी परिमंडलातील सर्व अभियंते व कर्मचार्‍यांचे भरभरून कौतुक केले. ‘कोरोनाच्या प्रादुर्भावात चक्रीवादळाचा मोठा तडाखा बसला. अत्यंत प्रतिकूल व खडतर भौगोलिक परिस्थितीत अभियंते व कर्मचार्‍यांनी दुरुस्तीचे अविश्रांत व अहोरात्र कामे केली. परिणामी, अत्यंत कमी कालावधीत संपूर्ण परिमंडलातील वीजपुरवठा पूर्ववत करण्यात आला. ही कामगिरी अभिमानास्पद आहे, असे पावडे यांनी नमूद केले. 
सातारा जिल्ह्यातील उत्कृष्ट तांत्रिक कर्मचारी पुढीलप्रमाणे : दीपक टंकसाळे, शरद घाटे, अमित माने, महेश काकडे, वैभव भोसले, शमीर मुलाणी (सातारा विभाग), राजेंद्र मनुकर, महेंद्र उगलमोगले, रवींद्र पोळ, नाना चव्हाण, प्रल्हाद संकपाळ, दिगंबर पवार, नवनाथ कारंडे (कराड विभाग), संजय जाधव, संपत लोणकर, केशव घुगरे, दीपक चव्हाण, राहुल वाघोले (फलटण विभाग), शंकर बागूल, किशोर दीक्षित, योगेश गोरखे, प्रवीण ओंबळे, गणेश जंगम (वाई विभाग), कृष्णा पवार, संजय कोळी, गणेश निकम, राहुल खरात, नितीन कुंभार (वडूज विभाग). 
यावेळी पुणे प्रादेशिक विभागस्तरावर ‘कोरोना वीजयोद्धा’ म्हणून पुरस्कार मिळालेले सहायक अभियंता दत्तात्रय जरे (वाई), वरिष्ठ तंत्रज्ञ स्वप्नील जाधव (सातारा), डिजिटल शाखा कार्यालय- कोळेवाडी (कराड), उत्कृष्ट उपकेंद्र- सदर बझार (सातारा) यांचाही गौरव करण्यात आला.
कार्यक्रमाचे उपमुख्य औद्योगिक संबंध अधिकारी श्रीकृष्ण वायदंडे यांनी सूत्रसंचालन करून आभार मानले.