sports

स्वच्छ सर्वेक्षण २०२० : देशातील ४२ स्वच्छ शहरांमध्ये विटा शहराची निवड, शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार सन्मान

 स्वच्छतेतील सन्मानासाठी देशातील निवडलेल्या ४२ शहरामध्ये विटा शहराची निवड झाली आणि हरएक विटेकरांनी स्वच्छतेसाठी केलेल्या कष्टाचे चीज झाले. शहरात स्वच्छतेची गतीमान लोकचळवळ उभा करण्यात आम्ही यशस्वी झालो. सलग तीन वर्षे विटेकरांनी स्वच्छता हा संस्कार बनवत प्रत्येकाने या स्वच्छतेच्या चळवळीत बहुमोल योगदान दिले आहे. विटा शहराचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा होणार सन्मान हरएक विटेकर नागरिकाचा गौरव आहे. - सौ. प्रतिभा वैभव पाटील, नगराध्यक्षा,  नगरपरिषद विटा

विटा प्रतिनिधी / दीपक पवार

 केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियान अंतर्गत स्वच्छ सर्वेक्षण २०२० या स्पर्धेत देशभरातील एकूण ४२४२ शहरांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेतील उच्चतम कामगीरी करणाऱ्या ४२ शहरांची अंतीम निवड केंद्रस्तरावर करण्यात आली. देशपातळीवर सन्मानासाठी निवडलेल्या ४२शहरांमध्ये विटा शहराची निवड झाली आहे. दि २० अ़ॉगस्ट २०२०  रोजी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विटा शहराचा मोठा सन्मान होणार आहे.
विटा नगरपरिषदेने शहरात स्वच्छतेची लोकचळवळ उभा करत सलग तीन वर्षे स्वच्छतेत देशपातळीवर चमकदार कामगीरी करत देशात नवा आदर्श निर्माण केला आहे. स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धेत विटा शहराने १००% कचरा मुक्त शहर, संकलित कचऱ्यावर शास्तोक्त पध्दतीने प्रक्रिया, कचऱ्यापासून बायोचार सेंद्रिय खत निर्मिती, वीजनिर्मिती, प्लास्टिक प्रक्रिया असे प्रकल्प यशस्वीपणे साकारले आहेत. विटा शहरातील पालिकेच्या मैला शुध्दीकरण प्रकल्प (FSTP Site Plant) ला राज्यात आदर्श मॉडेल म्हणून शासनाने जाहीर केले आहे. विटा पालिकेने कचरा मुक्त शहर करत सर्वांधिक स्वच्छ शहर म्हणून देशपातळीवर मिळवलेले स्थान कायम ठेवले. स्वच्छ सर्वेक्षण अंतर्गत कचरामुक्त शहर स्टार रेटींग मध्ये विटा शहरास थ्री स्टार नामांकन मिळाले आहे. हगणदारीमुक्त शहर म्हणून विटा शहराने (ODF++) नामांकन मिळवत स्वच्छतेत देशपातळीवर शहराचे अव्वल स्थान कायम ठेवले आहे.

विटा शहराने देशपातळीवर सलग तीन वर्षे रोविला यशाचा झेंडा

विटा नगरपरिषदेने स्वच्छ सर्वेक्षण २०२० मध्ये देशपातळीवर आपले अव्वल स्थान कायम ठेवत शहर स्वच्छतेमध्ये देशात अग्रेसर स्थान मिळवले आहे केंद्रशासनाने कचरा मुक्त शहर म्हणून विटा शहरास 3 स्टार नामांकन बहाल केले.तसेच ओडीएफ मध्ये प्लस प्लस नामांकन व   देशातील ४२ निवडलेल्या शहरांमध्ये  विटा शहराची निवड झाली  हे यश आपल्या सर्वांच्या महत्त्वपूर्ण योगदानामुळे लाभले आहे. शहरासाठी अहोरात्र झटणाऱ्या पालिका कर्मचारी, पदाधिकारी, आणि सर्वात महत्त्वाचे सर्व विटेकर नागरिक, संस्था, मंडळे, शाळा व पत्रकार आदी. आपल्या सर्वांचे या लोकचळवळीत अनन्यसाधारण महत्त्व आहे. आपल्या योगदानामुळे शहराला देशपातळीवर अभिमानास्पद असे यश प्राप्त झाले आहे. 
- वैभव सदाशिवराव पाटील