sports

निसंकोचपणे लसीकरणात सहभागी व्हा

डॉ. सचिन यादव यांचे आवाहन : परळी आरोग्य केंद्रात लसीकरणास प्रारंभ

‘परळी दर्‍याखोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला परळी आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचार्‍यांनी मोठ्या साहसाने तोंड देत हद्दपार केला आहे. यामध्ये ग्रामस्थांचेही सहकार्य होतेच, याच पार्श्‍वभूमीवर परळी येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला. 

सोनवडी : ‘परळी दर्‍याखोर्‍यातील कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाला परळी आरोग्य केंद्रातील सर्वच कर्मचार्‍यांनी मोठ्या साहसाने तोंड देत हद्दपार केला आहे. यामध्ये ग्रामस्थांचेही सहकार्य होतेच, याच पार्श्‍वभूमीवर परळी येथे लसीकरणाचा शुभारंभ झाला. 

आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार या दिवशी कोरोना लसीकरण करण्यात येईल. नोंदणीकरिता सेल्फ रजिस्ट्रेशन, ग्रामपंचायत येथे नोंद, अन्यथा परळी आरोग्य केंद्रात येऊन नोंदणी करता येईल. परिसरातील 60 वर्षांवरील सर्वांना तसेच 45 ते 59 या वयोगटांतील व्याधीग्रस्त नागरिकांना लस देण्यात येणार आहे. ही लस सुरक्षित असून, सर्वांनी निसंकोचपणे घ्यावी,’ असे आवाहन डॉ. सचिन यादव यांनी केले.  

गेल्या वर्षभरापासून संपूर्ण जगाला वेठीस धरणारा कोरोना पुन्हा महाराष्ट्रात सक्रिय होत असून, तितक्याच प्रभावीपणे संपूर्ण जिल्ह्यामध्ये कोरोना लसीकरण वेगाने होत आहे. 

रविवारी सातारा जिल्ह्यातील बहुतांश प्राथमिक आरोग्य केंद्रांना लसीकणाची मान्यता देत लसीकरणाची व्याप्ती ही वाढविली आहे. परळी प्राथमिक आरोग्य केंद्रात सीताराम सावळू निपाणे (रा. निगुडमाळ) या 66 वर्षीय ज्येष्ठ नागरिकास प्रथम कोविशिल्ड ही लस देऊन लसीकरणास प्रारंभ करण्यात आला. याप्रसंगी ते बोलत होते. 

यावेळी पंचायत समिती उपसभापती अरविंद जाधव, पंचायत समिती सदस्या विद्याताई देवरे, परळीचे सरपंच बाळासाहेब जाधव, उपसरपंच नंदकुमार धोत्रे, वैद्यकीय अधिकारी डॉ. सचिन यादव, डॉ. उर्मिला बनगर यांच्या उपस्थितीत लसीकरणाचा शुभारंभ करण्यात आला.

यावेळी परळी येथील ग्रामपंचायत सदस्य, ग्रामस्थ उपस्थित होते.

 

दररोज 100 जाणांना होणार लसीकरण
परळी भागातील लसीकरण हे आठवड्यातील सोमवार, बुधवार, शुक्रवार तीन दिवस होणार असून, दैनंदिन लसीकरणात 100 जाणांना लस दिली जाणार असून, यादिवशी सकाळी 9 ते 5 वेळेत लसीकरण होणार आहे.