sports

औंध येथील सिमेंट बंधारा निर्लेखित करू नये 

शेतकर्‍यांची तालुका कृषी अधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी 

येथील केदारेश्‍वर मंदिरानजीकच्या ओढ्यावरील सिमेंट बंधार्‍याचा सुमारे 35 शेतकर्‍यांना लाभ होत आहे. त्यामुळे शासनाने बंधारा निर्लेखित करू नये, अशी मागणी जगन्नाथ उर्फ दाजी गायकवाड यांच्यासह शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

औंध : येथील केदारेश्‍वर मंदिरानजीकच्या ओढ्यावरील सिमेंट बंधार्‍याचा सुमारे 35 शेतकर्‍यांना लाभ होत आहे. त्यामुळे शासनाने बंधारा निर्लेखित करू नये, अशी मागणी जगन्नाथ उर्फ दाजी गायकवाड यांच्यासह शेतकर्‍यांनी निवेदनाद्वारे तालुका कृषी अधिकारी यांच्याकडे केली आहे.

गायकवाड यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, 2012-2013 मध्ये कृषी विभागाने लोकांच्या मागणीवरून पाणी अडवा पाणी जिरवा योजनेंतर्गत केदारेश्‍वर मंदिरानजीकच्या ओढ्यावर सिमेंट नालाबांध बंधारा बांधला आहे. या बंधार्‍यातील पाण्यामुळे सुमारे 15 हेक्टर क्षेत्र ओलिताखाली आले आहे. शिवाय सहा विहिरी आणि 13 बोअरवेल यांच्या पाण्याची पातळी वाढली आहे. त्यामुळे या बंधार्‍याचा लाभ महारकी शिवारातील सुमारे 35 शेतकर्‍यांना होत आहे. 

परंतु काहीजण द्वेषापोटी बंधार्‍याचा त्रास होत असल्याचे कारण पुढे करून सिमेंट बंधारा फोडण्याचा निर्लेखित करण्याची मागणी करीत आहेत. त्यांची मागणी धांदात खोटी आणि शासनाची दिशाभूल करणारी आहे. शासनाने शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करून हा बंधारा निर्लेखित करू नये, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

निवेदनावर 35 शेतकर्‍यांच्या सह्या आहेत.


शासनाने शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करावा 
शासनाच्या मंडल कृषी विभागाने सुमारे 9 लाख रुपये खर्च करून हा सिमेंट बंधारा बांधला आहे. याचा फायदा शेतकर्‍यांना होत असताना कुणाच्या तरी मागणीवरून हा बंधारा पाडल्यास शासनाचा खर्च पाण्यात जाईल आणि लाभधारक शेतकर्‍यांचे नुकसान होईल. शासनाने शेतकर्‍यांच्या भावनांचा विचार करावा.