cineworld

“…त्यांचा खरा निशाणा शाहरुख खान”

आर्यन खान ड्रग्ज प्रकरणी शत्रूघ्न सिन्हांचे मोठे विधान

मुंबई : बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अटक करण्यात आली आहे. तेव्हापासून आर्यन खान त्याचा मित्र अरबाज मर्चंट आणि मुनमुन धामेचासह १४ दिवस न्यायालयीन कोठडीत आहे. शाहरुख खानच्या मुलाचे नाव ड्रग्स प्रकरणात समोर आल्यानंतर संपूर्ण बॉलिवूड त्याला पाठिंबा देत आहे. तर अनेक राजकारणी देखील आर्यन खानच्या बचावात समोर आले आहेत. अलिकडेच अभिनेते आणि राजकारणी शत्रुघ्न सिन्हा यांनीदेखील या प्रकरणावर प्रतिक्रिया देत एक शंका उपस्थित केली आहे.
कार्डेलिया क्रूझ ड्रग्ज प्रकरणात अनेक गोष्टी अतिशयोक्तीपूर्ण असून खूपच वाढवून सांगितलं जात असल्याचं असल्याचं मत शत्रुघ्न सिन्हा यांनी व्यक्त केलंय. बॉलिवूडमध्ये ड्रग्जचा ट्रेंड वाढतोय का, यावर ते म्हणाले की छोट्या स्तरावर अशा गोष्टी घडत असतील पण ते जेवढ्या प्रमाणात सांगितलं जातंय, तेवढं तरी नक्कीच नाही. मुद्रा बंदरावर मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज जप्त करण्यात आले आहेत, त्या प्रकरणापासून लोकांचे लक्ष हटवण्यासाठी हे प्रकरण उगाच मोठे केले जात असल्याची चर्चा असल्याचंही ते म्हणाले. तसेच बॉलिवूड स्टार शाहरुख खान मुंबई क्रूज ड्रग्स प्रकरणी निशाण्यावर असू शकतो, अशी शक्यताही सिन्हा यांनी एनडीटीव्हीशी बोलताना वर्तवली.
‘मला वाटतंय की यामागे एक षड्यंत्र आहे. हे प्रकरण सध्या विचाराधीन असल्याने मी त्याबद्दल जास्त काही बोलणार नाही. आर्यनकडून ड्रग्स जप्त करण्यात आलेले नाहीत. त्याची रक्त तपासणी करण्यात आलेली नाही, लघवीची चाचणी करण्यात आलेली नाही आणि या कथित अटकेमध्ये काही पक्षांचे लोकही सहभागी होते. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांनी केलेले आरोप लक्षात घेण्यासारखे आहेत. त्यांचे सर्व आरोप कदाचित खरे नसतील पण तपास झालाच पाहिजे,” असंही शत्रुघ्न सिन्हा म्हणाले.