sports

‘आम्ही म्हसवडकर’च्या आंदोलनाने प्रशासनाला आली जाग

म्हसवडमध्ये प्रशासनाकडून खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण

म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, रोज वाढणार्‍या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे होत असलेले हाल पाहून शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 28) एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तत्काळ दखल घेत माणच्या प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येऊन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेत आजपासून हे रु

म्हसवड : म्हसवड शहरात दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून, रोज वाढणार्‍या कोरोना रुग्णांना दाखल करण्यासाठी म्हसवडसह जिल्ह्यात कोठेही बेड उपलब्ध होत नसल्याने सर्वसामान्य रुग्णांचे होत असलेले हाल पाहून शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी (दि. 28) एकत्र येत म्हसवड आरोग्य केंद्रासमोर ठिय्या मांडत प्रशासनाच्या विरोधात जोरदार केलेल्या घोषणाबाजीची तत्काळ दखल घेत माणच्या प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी म्हसवड येथे येऊन शहरातील धन्वंतरी रुग्णालय हे ताब्यात घेत आजपासून हे रुग्णालय ‘कोव्हिड रुग्णालय’ म्हणून ओळखले जाईल, असे जाहीर केल्याने ‘आम्ही म्हसवडकर’च्यावतीने पुकारण्यात आलेल्या या आंदोलनाला अखेर यश मिळाले असल्याच्या भावना यावेळी कार्यकर्त्यांनी व्यक्त केल्या.
म्हसवड शहरातील कोरोना रुग्णांची संख्या ही 150च्या घरात गेली असून, शहरात दररोज वाढत जाणार्‍या रुग्णांना अ‍ॅडमीट करण्यासाठी येथील कोव्हिड सेंटरमध्ये बेड उपलब्ध नाहीत. ही बाब गंभीर असल्याने म्हसवडसह परिसरातील बाधित रुग्णांना वेळेवर बेड उपलब्ध व्हावे, याकरीता येथील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या कार्यकर्त्यांनी प्रयत्न करून यामध्ये प्रशासनाने लक्ष घालण्याची मागणी केली होती. मात्र, त्यांच्या या मागणीकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने म्हसवड शहरात रुग्ण दाखल करण्यास खूप अडचणी येत आहेत. 
येथील परिस्थिती हाताबाहेर जावू नये, याकरिता जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी शहरातील 3 खासगी रुग्णालये अधिग्रहण करण्याचे आदेश प्रशासनाला दिले असताना देखील केवळ प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे व खासगी रुग्णालयाशी असलेले आपले हित संबंध जोपासण्यासाठी प्रशासनाकडून ती ताब्यात घेण्यात आली नव्हती. मात्र, दररोज म्हसवड शहरात रुग्ण झपाट्याने वाढू लागल्याने अखेर शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’ने एकत्र येत येथील आरोग्य केंद्रातच ठिय्या मांडत जोवर म्हसवड शहरातील खासगी रुग्णालयांचे अधिग्रहण प्रशासन करणार नाही, तोवर जागेवरून न उठण्याचा निर्धार करीत प्रशासनाच्या विरोधात जोरदार नारेबाजी केली.
 या नारेबाजीची दखल घेत सदर आंदोलनाला माणच्या तहसीलदार बाई माने व प्रांताधिकारी अश्‍विनी जिरंगे यांनी भेट देत आंदोलनकर्त्यांशी चर्चा करून त्यांना सोबत घेत येथील धन्वंतरी रुग्णालय गाठत ते अधिग्रहण करून ताब्यात घेतले. 
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. भारत काकडे, मुख्याधिकारी सचिन माने, सपोनि गणेश वाघमोडे,  मंडलाधिकारी दळवी, तलाठी आखडमल आदी उपस्थित होते.


सुमारे तीन तास ‘आम्ही म्हसवडकर’चे कार्यकर्ते रस्त्यावर
म्हसवड शहरातील वाढणार्‍या कोरोना रुग्णांना जिल्ह्यात कोठेच बेड उपलब्ध होत नसल्याने प्रशासनाने जिल्हाधिकार्‍यांचा आदेश पाळत शहरातील खासगी रुग्णालयांचे त्वरित अधिग्रहण करावे, यासाठी शहरातील ‘आम्ही म्हसवडकर ग्रुप’च्या सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी येथील आरोग्य केंद्रासमोर सुमारे तीन तास ठिय्या मांडत आंदोलन केले.


जय भगवान हॉस्पिटल अधिग्रहण करण्यास प्रशासनाची टाळाटाळ 
शहरात सध्या गत सहा महिन्यांपासून बंद असलेले जय भगवान हॉस्पिटल हे कोव्हिड सेंटरसाठी उपलब्ध करून देण्याची तयारी हॉस्पिटलचे मालक डॉ. राजेंद्र खाडे यांनी केली असताना केवळ किरकोळ तांत्रिक कारणाने सदरचे हॉस्पिटल अधिग्रहण करण्यास प्रशासनाकडून टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप या आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला.


प्रशासनाकडून मेरीमाता व दोलताडे रुग्णालयाची पाहणी 
म्हसवड शहरात अधिग्रहण केलेले धन्वंतरी रुग्णालय फुल्ल झाल्यावर त्यानंतर रुग्णांना दाखल करण्यास आरोग्य विभागाला कोणतीही अडचण येऊ नये म्हणून प्रातांधिकारी जिरंगे, तहसीलदार बाई माने, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण कोडलकर, डॉ. कदम, मुख्याधिकारी सचिन माने, सपोनि गणेश वाघमोडे, मंडलाधिकारी दळवी, तलाठी आखडमल यांच्या पथकाने शहरातील मेरीमाता हायस्कूल व दोलताडे हॉस्पिटलला भेट देत तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.


कोरोना संपेपर्यंत ‘आम्ही म्हसवडकर’चा लढा सुरूच राहणार
कोरोनाचा संसर्ग जेव्हापासून सुरू झाला आहे, तेव्हापासून शहरातील सर्व पक्षीय कार्यकर्त्यांनी आपले राजकीय गट-तट बाजूला ठेवत शहरवासीयांची सेवा करण्यासाठी एकत्र येत शहरात ‘आम्ही म्हसवडकर’ नावाचा एक ग्रुप तयार केला. या ग्रुपने आजवर शहरात गस्त घालणे, प्रशासनाला सर्वतोपरी मदत करणे, रुग्णांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणे असे काही सामाजिक उपक्रम राबवत असून शहरातील बाधित रुग्णांना बेड उपलब्ध करण्यासाठी त्यांनी सदरचे आंदोलन केले असले तरी कोरोना जोवर पूर्णपणे संपत नाही तोवर ‘आम्ही म्हसवडकर’चा लढा हा असाच कायम सुरू राहणार असल्याचे या ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सांगितले.