संजय राऊत :शरद पवारांचे पाच खासदार फोडा अन् केंद्रात मंत्रिपद घ्या, अजितदादांना ऑफर; संजय राऊतांचा मोठा गौप्यस्फोट
Sanjay Raut on Sharad Pawar : उद्योगपती गौतम अदानी यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली आहे.
गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांचा वाढदिवस होता. या निमित्ताने दिल्लीत मोठ्या राजकीय घडामोडी पाहायला मिळाल्या. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी शरद पवारांच्या निवासस्थानी जात त्यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. तर उद्योगपती गौतम अदानी (Gautam Adani) यांच्या दिल्लीतील घरी शरद पवार गटातील एक बडा नेता आणि भाजपच्या एका केंद्रीय नेत्याची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली. तसेच राष्ट्रवादी शरद पवार गटात दोन गट पडले असून काही खासदार अजित पवार यांच्यासोबत सत्तेत सहभागी होण्यास इच्छुक असल्याची चर्चा आहे. यावरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
संजय राऊत म्हणाले की, अजित पवार गटाला केंद्रात मंत्रीपद मिळालेले नाही. कारण मंत्रीपदाचा केंद्रात फॉर्म्युला ठरलेला आहे. साधारण सहा खासदारामागे एक मंत्रीपद अशी माझी माहिती आहे. प्रफुल्ल पटेल किंवा अजित पवार गटाला सांगितलं आहे की, तुम्ही पवार साहेबांचे पाच खासदार फोडून घेऊन या. तेव्हा तुमचा सहाचा कोटा पूर्ण होईल आणि मग तुम्हाला मला मंत्री पद देऊ, असा गौप्यस्फोट त्यांनी केला आहे.
फुटणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे
पवार साहेबांनी कष्टाने निवडून आणलेले खासदार, वयाच्या 84 व्या वर्षी जीवाचे रान करून त्यांनी खासदार निवडून आणले आणि हे लोक त्यांचे पक्ष सोडत असतील तर फुटणाऱ्यांना याची लाज वाटली पाहिजे. ते कोणीही असो, फुटणाऱ्यांना शरम वाटली आहे, असा हल्लाबोल देखील संजय राऊत यांनी केला आहे.
...तर महाराष्ट्राशी बेईमानी केल्यासारखे होईल
राष्ट्रवादी शरद पवार गटाचे काही खासदार नॉट रिचेबल असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. याबाबत विचारले असता संजय राऊत म्हणाले की, मला असे वाटत नाही. काल वाढदिवसानिमित्त शरद पवार गटाचे सर्व खासदार दिल्लीत उपस्थित होते. काही लोकांनी अद्याप लाज शिल्लक ठेवल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. बाळासाहेब ठाकरेंनंतर शरद पवार एक मोठे नेते आहेत. जर कुणी त्यांच्याशी बेईमानी केली तर ती महाराष्ट्राशी बेईमानी केल्यासारखे होईल, असे त्यांनी म्हटले आहे.