फलटण : ऐतिहासिक प्रभू श्रीराम रथोत्सव यात्रा फलटणसह राज्याच्या विविध भागातून आलेल्या हजारो श्रीराम भक्तांच्या उपस्थितीत “प्रभू श्रीरामचंद्र की जय,प्रभू श्रीरामचंद्र की जय..” च्या नामघोषात परंपरागत पध्दतीने मोठ्या भक्तिपूर्ण वातावरणात पार पडली.
दरवर्षी मार्गशीर्ष शुध्द प्रतिपदेला म्हणजे देवदिवाळीच्या दिवशी प्रभू श्री रामाची सजविलेल्या रथातून नगर प्रदक्षिणा होते. ह.भ.प सतीश महाराज खोमणे यांची किर्तन सेवा झाल्यानंतर दहीहंडी ह.भ.प खोमणे यांच्या हस्ते फोडण्यात आली. आज सकाळी 8.15 वाजता जिल्हा परिषद माजी अध्यक्ष व नाईक-निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे सचिव श्रीमंत संजीवराजे नाईक-निंबाळकर यांच्या हस्ते रथाचे विधिवत पूजन झाले.तसेच प्रशासनाच्या वतीने तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांनी पूजन केले .त्यानंतर प्रभू श्रीराम, सीता मातेच्या मूर्ती रथामध्ये ठेवून त्यांची विधिवत पूजा व आरती करण्यात आली. फळे, फुले, पाने आणि विविधरंगी निशाणे लावून सजविलेला हा रथ नगर प्रदक्षिणेसाठी मार्गस्थ झाला. यावेळी राजघराण्यातील माजी जिल्हा परिषद सदस्या श्रीमंत शिवांजलिराजे नाईक निंबाळकर, पंचायत समितीचे माजी सभापती श्रीमंत. विश्वजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत सत्यजितराजे नाईक निंबाळकर, श्रीमंत मिथिलाराजे नाईक निंबाळकर, शहर पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक हेमंत शहा, नाईक निंबाळकर देवस्थान ट्रस्टचे ट्रस्टचे विश्वस्त शरद रणवरे, व्यवस्थापक दशरथ यादव,संदिप भोसले ट्रस्टचे विश्वस्त यांच्यासह मानकरी व भाविक उपस्थित होते.
श्री राम मंदिरापासून नगर प्रदक्षिणेसाठी निघालेल्या या रथाचे शिंपी गल्लीतून बारामती चौक,छ.शिवाजी महाराज चौक, डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, संत ज्ञानेश्वर मंदिर, प. पू. गोविंद महाराज उपळेकर मंदिर, डेक्कन चौक, म. फुले चौक, मारवाड पेठ मार्गाने बारस्कर चौक, रंगारी महादेव मंदिरापासून बाणगंगा नदीपात्र, मलठण भागातील सद्गुरू हरीबुवा मंदिरापासून फिरत गजानन चौक या मार्गाने सायंकाळी पुन्हा श्रीराम मंदिरासमोरील रथखाण्यात पोहोचला.
दरम्यान,डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे रथाचे पूजन व स्वागत फलटण नगर परिषदेच्या वतीने मुख्याधिकारी निखिल मोरे व अधिकारी , कर्मचारी यांनी केले. रथ प्रदक्षिणेच्या मार्गावर ग्रामीण भागातून मोठ्या संख्येने आलेल्या अबालवृध्दांनी प्रभू श्रीरामाचे शहरात ठिकठिकाणी मोठ्या भक्तिभावाने दर्शन घेतले. शहरवासीयांनी रथमार्गावर सडा रांगोळ्या घालून प्रभू श्री रामाचे स्वागत केले. त्याचप्रमाणे ठिकठिकाणी थांबून शहरवासीय आणि ग्रामीण भागातील तसेच परगावच्या भक्त मंडळींनी प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले. या रथोत्सवासाठी बारामती, इंदापूर, माळशिरस,पुरंदर, खंडाळा, माण, खटाव, कोरेगाव या तालुक्यातूनही भाविक मोठ्या संख्येने आले होते. नोकरी व्यवसायानिमित्त पुणे, मुंबई आणि अन्य शहरात असलेले येथील रहिवासीही आपल्या कुटुंबीयांसह रथयात्रेसाठी आणि प्रभू श्री रामाच्या दर्शनासाठी आले होते.
रामरथोत्सवाच्या निमित्ताने येथे जवळपास 8/10 दिवस मोठी यात्रा भरते. त्यामध्ये मेवा मिठाईची दुकाने, लहान मुलांच्या खेळण्यांची दुकाने, स्त्रियांची विविध आभुषणे, बंगड्यांच्या दुकानांचीही रेलचेल असते. संसारोपयोगी साहित्य, कपडे यांचीही दुकाने असतात. विविध प्रकारची करमणुकीची साधने व खेळ, उंच उंच पाळणे, रेल्वे, फिरती चक्रे आदी मनोरंजनाची व लहान मुलांचे आकर्षण ठरणारी साधनेही या यात्रेत दाखल झाली आहेत.रथोत्सवाच्या पार्श्वभूमीवर चोख पोलीस बंदोबस्त सगळीकडे नेमण्यात आला होता