महाराष्ट्र हवामान बातम्या : कडाक्याच्या थंडीतच पावसाच्या सरी; राज्यात वरुणराजाच्या पुनरागमनानं वाढवली चिंता
Maharashtra Weather News : हवामानासंदर्भातील आताच्या क्षणाची मोठी आणि महत्त्वाची बातमी.... थंडीचा कडाका वाढत गेला आणि अचानकच राज्याच पाऊस आला. पाहा हवामान विभागानं दिलेला इशारा...
Maharashtra Weather News : उत्तरेकडील राज्यांमध्ये अर्थात काश्मीच्या खोऱ्यासह पर्वतीय क्षेत्रामध्ये कडाक्याची थंडी पडली असून, या भागांमध्ये सध्या 'चिल्लई कलां' अर्थात रक्त गोठवणाऱ्या थंडीचा काळ सुरू झाला आहे. असं असलं तरीही महाराष्ट्रात मात्र हवामानात लक्षणीय बदल होत असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील तापमानात पुढील 24 तासांमध्ये चढ- उतार अपेक्षित असून, काही ठिकाणी पावसाच्या सरींची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
काश्मीर वगळता उत्तरेकडील हिमाचल, पंजाब यांसारख्या भागांमध्ये तापमानात फरक दिसून आल्यामुळं देशभरातील हवामानात बदल अपेक्षित असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच बंगालच्या उपसागरातील पूर्वमध्य क्षेत्रामध्ये कमी दाबाचा पट्टा तयार झाल्यामुळं या प्रणालीचा सर्वाधिक परिणाम देशाच्या दक्षिण किनारपट्टी क्षेत्राकडे दिसून येणार आहे. दरम्यानच्या काळात धुळ्यापासून परभणी, निफाडपर्यंत किमान तापमानात दोन ते तीन अंशांची वाढ अपेक्षित आहे.
राज्याच्या बहुतांश भागांमध्ये सध्या तापमानाचा आकडा 10 अंशांच्या वर गेला असून, सोलापूर इथं उच्चांती तापमानाची नोंद करण्यात आली आहे. मुंबई, पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण क्षेत्रामध्येही सध्या पश्चिमी झंझावाताचा परिणाम दिसणार असून, त्यामुळं 26 डिसेंबरला पावसाचा इंदाज वर्तवण्यात आला आहे.