maharashtra

जयंत पाटील यांना ईडीचं दुसऱ्यांदा समन्स, 22 मे रोजी चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश


ED summons Jayant Patil for the second time, ordering him to appear for questioning on May 22
जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावी अशी विनंती जयंत पाटील यांनी केली होती, अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य केली.

Jayant Patil: आयएल आणि एफएस (IL & FS) प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांना ईडीनं  (ED Notice)  दुसऱ्यांदा समन्स बजावलं आहे. 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना या समन्समध्ये करण्यात आली आहे. जयंत पाटील यांना गेल्या गुरुवारीच हजर राहण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र त्यांनी वेळ वाढवून मागितली. त्यांची विनंती मान्य करत ईडीनं त्यांना एक आठवड्यानं म्हणजेच  22  मे रोजी चौकशीसाठी बोलावलं आहे.

ईडीने याअगोदर समन्स  बजावत जयंत पाटील यांना  चौकशीसाठी आज (15 मे) हजर राहण्याचे आदेश नोटीसीमधून देण्यात आले होते. मात्र जवळच्या नातेवाईकांचे दोन दिवसांत लग्न समारंभ असल्याने आपण चौकशीसाठी हजर राहू शकत नाही आणि त्यामुळे चौकशीसाठी वेळ वाढवून मिळावे या बाबतचे पत्र जयंत पाटील यांनी  ईडीला पाठवत चौकशीसाठी मुदत मागितली होती. अखेर ईडीने त्यांची विनंती मान्य करत 22 मे रोजी चौकशीला हजर राहण्याची सूचना केली आहे.

कंपनीसोबत माझा एक रुपयाचाही व्यवहार नाही : जयंत पाटील
दरम्यान जयंत पाटील यांच्याशी संबंधित काही संस्थांना 'आयएल अँड एफएस' प्रकरणातील काही आरोपी कंपन्यांनी 'कमिशन रक्कम' दिल्याचा आरोप ईडीने केला आहे आणि याच व्यवहारांबद्दल जयंत पाटील यांची चौकशी करुन त्यांचे जबाब नोंदवले जातील. मात्र या आलेल्या नोटीसवर प्रतिक्रिया देताना जयंत पाटील यांनी ज्या 'आयएल अँड एफएस' कंपनीच्या प्रकरणात ईडीने नोटीस बजावली आहे, त्या कंपनीसोबत माझा रुपयाचाही व्यवहार नाही. जिथे काही देणे-घेणेच नाही, तिथे नोटीस काढली जात आहे. ईडी नोटीस का काढते, हे सगळ्या देशाला माहित आहे, अशी प्रतिक्रिया काल माध्यमांना दिली होती.