maharashtra

सेवागिरी महाराज रथ दर्शन होणार सुलभ

एसटी स्टॅंडवरील छ. शिवाजी चौकात भाविकांसाठी १२ तास दर्शनासाची सोय

Sevagiri Maharaj Rath Darshan will be easy
लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुसेगाव येथील प पू श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची स्थापना केलेल्या रथाचे दर्शन घेण्याची सोय ट्रस्टकडून करण्यात आली आहे. एसटी स्टॅंडवरील छ. शिवाजी चौकात शनिवारी (ता. १) सकाळी सात वाजलेपासून भाविकांना रथाचे दर्शन घेता येणार आहे.

पुसेगाव : लाखो भाविकांचे श्रध्दास्थान असलेल्या पुसेगाव येथील प पू श्री सेवागिरी महाराजांच्या पादुका व प्रतिमेची स्थापना केलेल्या रथाचे दर्शन घेण्याची सोय ट्रस्टकडून करण्यात आली आहे. एसटी स्टॅंडवरील छ. शिवाजी चौकात शनिवारी (ता. १) सकाळी सात वाजलेपासून भाविकांना रथाचे दर्शन घेता येणार आहे. सेवागिरी मंदीरातही महाराजांच्या संजीवन समाधीचे रांगेतून दर्शन घेण्याची सोय करण्यात आल्याची माहिती चेअरमन मोहनराव पाटील आणि विश्वस्त डॉ. सुरेश जाधव यांनी दिली.
श्री सेवागिरी महाराजांचा रथोत्सव शनिवार दिनांक १ जानेवारी रोजी पार पडणार आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या कोरोना प्रतिबंधात्मक नियमांचे पालन व्हावे आणि भाविकांना रथाचे दर्शन सुलभ व्हावे म्हणून सकाळी ७:०० ते सायंकाळी ७:४५ पर्यंत एसटी स्टॅंडवरील छत्रपती शिवाजी महाराज चौकात हा रथ स्थिर दर्शनासाठी उभा करण्यात येणार आहे. तसेच महाराजांच्या संजीवन समाधीचे दर्शन घेताना मंदिर परिसरात गर्दी होऊ नये यासाठी दर्शन रांगेची सोय करण्यात आली आहे. 
सकाळी १०:३० वाजता जिल्ह्यातील मान्यवरांच्या हस्ते रथपूजन करण्यात येणार आहे. वडूज, दहिवडी, फलटण आणि सातारा बाजूकडून येणाऱ्या भाविकांना एसटी स्टॅंडवरच रथाचे दर्शन घेण्याची सोय ट्रस्टने केल्याने समाधान व्यक्त होत आहे. 
रथमार्गावरील खड्ड्यांची तात्पुरती मलमपट्टी
श्री सेवागिरी महाराज मंदीरापासून पोलीस स्टेशन आणि रथ उभा करण्यात येणाऱ्या छत्रपती शिवाजी चौकातील रस्त्यावर खड्ड्यांचे साम्राज्य आहे. दर वर्षी रथोत्सवाअगोदर या रथमार्गावर डांबर आणि खडीचे कार्पेट करुन दुरुस्ती केली जाते. यंदा मात्र काही खड्ड्यांमध्ये थोडेफार कॉंक्रिट टाकून मलपट्टी करण्यात आल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे.